लोणार, दि. ८ (प्रतिनिधी) :
मेहकर मतदारसंघात आर्थिक, सामाजिक व राजकीयदृष्ट्या सुपरिचित असलेल्या लोणार येथील मापारी परिवार व बुलढाणा जिल्ह्यात ठेकेदारी व्यवसायात अव्वल स्थानी असलेल्या काटे परिवारातील विवाह सोहळा मेहकर येथील बालाजी नगर परिसरात हजारो नागरिकांच्या उपस्थितीत अत्यंत थाटामाटात व आदर्शवत पद्धतीने पार पडला.
लोणार येथील बाबुराव मापारी यांच्या चार मुलांपैकी एक असलेले शिवछत्र मित्र मंडळाचे अध्यक्ष नंदकिशोर मापारी यांचे पुत्र आदित्य मापारी यांचा विवाह बुलढाणा जिल्ह्यासह महाराष्ट्र व देशातील विविध भागांत ठेकेदारी व्यवसायात कार्यरत असलेले अर्जुनराव काटे व साहेबराव काटे महाराज यांच्या कुटुंबातील राजूभाऊ काटे यांच्या कन्येशी मोठ्या उत्साहात पार पडला. वर आदित्य मापारी हे चार्टर्ड अकाउंटंट असून वधू बीकॉम, एमबीए शिक्षित असल्याने हा विवाह विशेष आकर्षण ठरला.
या सोहळ्यास बुलढाणा, वाशिम व अकोला जिल्ह्यातील राजकीय, शैक्षणिक, शासकीय, धार्मिक व व्यावसायिक क्षेत्रातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. जवळपास दहा हजार वऱ्हाडी सामावून घेईल असा भव्य मंडप, आकर्षक स्टेज, नेत्रदीपक रोषणाई आणि उत्कृष्ट भोजन व्यवस्थेमुळे उपस्थितांनी समाधान व्यक्त केले. प्रत्येक पाहुण्याचे आपुलकीने स्वागत व विचारपूस करण्यात येत होती.
या आदर्शवत विवाह सोहळ्यास केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव, माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, आ. अमित झनक, आ. श्वेताताई महाले, माजी आ. धृपतराव सावळे, आ. मनोज कायंदे, आ. सिद्धार्थ खरात, माजी आ. विजय जाधव, माजी आ. संजय रायमूलकर, शिवसेना उबाठा माजी आ. रणजीत पाटील, प्रवक्त्या जयश्रीताई शेळके, बुलढाणा नगराध्यक्षा पूजाताई गायकवाड, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खाजगी सचिव विद्याधर महाले, पोलीस अधीक्षक एस. पी. तांबे, अभियंता काळे, अभियंता पवार, चंद्रशेखर शिखरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
अभंग सादर करून हिंदू संस्कृतीचे जतन
या विवाह सोहळ्याचे खरे वैशिष्ट्य म्हणजे कोणताही सत्कार किंवा राजकीय भाषणे न ठेवता विवाह वेळेत पार पाडण्याचा निर्णय केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव व दोन्ही परिवारांनी घेतला. या विवाहात साधेपणाला प्राधान्य देत फटाके, धूर किंवा ऑर्केस्ट्रा टाळण्यात आले. हिंदू संस्कृतीचे जतन करत स्वर गुरुकुंजच्या गुरुदेव मंडळांनी अभंग सादर करून वऱ्हाडी मंडळींना मंत्रमुग्ध केले. स्टेजवर येताच तत्काळ मंगलाष्टका सुरू करण्यात आल्या व सायंकाळी ७.३० वाजण्याच्या आत विवाह विधी पूर्ण झाला.
कार्यक्रमास संपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर, मदनराजे गायकवाड, विष्णू कुळसुंदर, काँग्रेस नेते शाम उमाळकर, मेहकर नगराध्यक्ष किशोर गारोळे, शिवसेना जिल्हाप्रमुख बळीराम मापारी, लोणार नगराध्यक्षा मीराताई मापारी, संतोष मापारी, कासम गवळी, उपजिल्हाप्रमुख आशिष रहाटे, पत्रकार राजेंद्र काळे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
Users Today : 28