लोखंडी टॉमीने महिलेच्या डोक्यावर प्रहार चार जणांवर गुन्हा दाखल; वाघुड येथील घटना

Khozmaster
2 Min Read

मलकापूर, दि. ८ (प्रतिनिधी) :
वाघुड (ता. मलकापूर) येथे घरासमोर पाण्याची नळी का टाकली, या कारणावरून दोन कुटुंबांत तुफान राडा झाला. या वादातून आरोपींनी महिलेसह तिच्या कुटुंबीयांना बेदम मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता लोखंडी टॉमीने महिलेच्या डोक्यावर प्रहार करून तिला गंभीर जखमी करण्यात आले. या रक्तरंजीत हाणामारी प्रकरणी मलकापूर शहर पोलिसांत चार जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मलकापूर तालुक्यातील वाघुड येथील रहिवासी जिजाबाई ज्ञादेव बगाडे (वय ४२) यांचे घर आणि आरोपींची जागा समोरासमोर आहे. ८ फेब्रुवारी रोजी सकाळी ८.३० ते ९ वाजताच्या दरम्यान निनाजी केणेकर नामक व्यक्ती आरोपी गोविंदा राऊत यांच्या घराच्या बांधकामासाठी पाणी मारण्याकरिता पाईप टाकण्यासाठी गेला. यावेळी पाण्याची नळी जिजाबाई यांच्या घरासमोर टाकण्यात आली.

यावर जिजाबाई यांनी “आमच्या जागेत नळी टाकू नको” असे म्हणत विरोध केला. हा विरोध पाहून आरोपी गोविंदा गोपाळ राऊत याने जिजाबाई यांना जिवे मारण्याची धमकी दिली व त्यांच्यावर विटा फेकून मारहाण सुरू केली.

आईवर हल्ला होत असल्याचे पाहून जिजाबाई यांचा मुलगा व पती मदतीला धावून आले. त्यावेळी आरोपी गोविंदा राऊत, अन्नपूर्णा राऊत, करण राऊत आणि गौरव राऊत या चौघांनी त्यांनाही चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली. याचदरम्यान आरोपी करण मुरली राऊत याने हातातील लोखंडी टॉमीने जिजाबाई यांच्या डोक्यावर जोरदार वार केला. त्यामुळे जिजाबाई गंभीर जखमी होऊन जमिनीवर कोसळल्या.

हल्ल्यानंतर आरोपींनी “आमच्या नादाला लागल्यास एकालाही जिवंत ठेवणार नाही” अशी धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे. जखमी अवस्थेत जिजाबाई यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला.

या प्रकरणी जिजाबाई बगाडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून मलकापूर शहर पोलिसांनी आरोपी गोविंदा गोपाळ राऊत, अन्नपूर्णा गोपाळ राऊत, करण मुरली राऊत व गौरव मुरली राऊत (सर्व रा. वाघुड) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेचे कलम ११८ (१), ३५१ (२), ३ (५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार रामचंद्र भोपळे करीत आहेत.

दरम्यान, या झटापटीत व ओढाताणीत जिजाबाई यांच्या गळ्यातील सुमारे १५ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत कुठेतरी पडून गहाळ झाल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

0 9 4 8 5 6
Users Today : 28
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *