मेहकर, दि. ८ (प्रतिनिधी) :
तत्कालीन आमदार संजय रायमूलकर यांनी उपलब्ध करून दिलेल्या एक कोटी रुपये निधीतून गजानन महाराज मंदिर परिसराची संरक्षण भिंत तसेच भव्य सभागृहाचे बांधकाम करता आले. त्यांच्या दातृत्वामुळे मंदिराच्या वैभवात भर पडली, असे प्रतिपादन गजानन महाराज सेवा समितीचे अध्यक्ष श्याम उमाळकर यांनी केले.
श्रींच्या प्रगट दिन उत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. कार्यक्रमात महाप्रसाद वितरण संजय रायमूलकर यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रगटदिनानिमित्त डोणगाव मार्गावरील गजानन महाराज मंदिरात हभप देवदत्त पितळे व गोपाल पितळे यांचे प्रवचन आयोजित करण्यात आले होते. या प्रवचनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
या कार्यक्रमास माजी आमदार संजय रायमूलकर, लोणारच्या नगराध्यक्ष मीराताई भूषण मापारी, नगरसेवक संजय ढाकरके, बाळू सिंगनाथ, नीलेश मानवतकर, तसेच शैलेश सावजी, आशिष रहाटे, भास्करराव गारोळे, प्रदीप देशमुख, वामनराव झोरे, अनंतराव वानखेडे, भैय्यासाहेब देशमुख, केशवराव फुके, विष्णुपंत पाखरे, कलीम खान, विलासराव काळे, वसंतराव देशमुख आदी मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
श्याम उमाळकर म्हणाले की, गेल्या पंधरा वर्षांपासून प्रगटदिन उत्सव साजरा केला जात असून शहरासह आजूबाजूच्या परिसरातून भाविक मोठ्या संख्येने येथे येतात, ही अत्यंत आनंदाची बाब आहे.
यावेळी संजय रायमूलकर यांनी सांगितले की, मेहकर व लोणार तालुक्यातील ६० गावांमध्ये गजानन महाराज मंदिराच्या ठिकाणी सभागृह उपलब्ध करून देता आले, हे माझे भाग्य आहे. तसेच जाती-पातीचा विचार न करता दोन्ही तालुक्यांमध्ये ६०० पेक्षा अधिक सभामंडपांच्या बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला, असेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमात सेवा समितीचे सुदेश लोढे, वैभव उमाळकर, सुरेश मुंदडा, घनश्याम जोशी, गोपाल पाखरे, चंद्रशेखर जोशी आदी उपस्थित होते. हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
Users Today : 35