बुलढाणा : बुलढाणा ते चिखली रोडवरील साखळी फाट्याजवळ ट्रक आणि कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात मोहदरी (ता. मेहकर) येथील ३० वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून कारचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे.
मृत तरुणाचे नाव महेश कडुबा लोढे (वय ३० वर्षे) असे असून त्यांची भादोला (ता. बुलढाणा) येथे सासुरवाडी आहे. ८ फेब्रुवारी रोजी रात्री सुमारे १.३० वाजता महेश हे सासुरवाडीवरून त्यांच्या स्विफ्ट डिझायर कार (एमएच-२८-बीक्यू-२४१८) ने मोहदरीकडे परतत होते.
दरम्यान, साखळी फाट्याजवळील पुलासमोर समोरून भरधाव वेगात येणाऱ्या बीआर-०६-जीसी-८४१२ क्रमांकाच्या ट्रकने महेश यांच्या कारला जोरदार धडक दिली. या अपघातात महेश लोढे यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघातानंतर मदत न करता ट्रक चालकाने वाहन घटनास्थळीच सोडून पळ काढला, त्यामुळे परिसरात संताप व हळहळ व्यक्त होत आहे.
या प्रकरणी महेशचे काका केशव माधवराव लोढे (वय ५०) यांनी बुलढाणा ग्रामीण पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी ट्रक चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहितेचे कलम १०६, २८१, ३२४ (४) तसेच मोटार वाहन कायद्याचे कलम १३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
Users Today : 28