शेगाव, दि. ८ (प्रतिनिधी) :
शेगाव येथे २५ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय आयुष आरोग्य मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी प्रशासनासह विविध संभाव्य स्थळांना भेट देत कार्यक्रम स्थळाची पाहणी केली.
केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या वतीने बुलढाणा जिल्ह्यातील संतनगरी शेगाव येथे हा भव्य आरोग्य मेळावा आयोजित करण्यात आला असून, या कार्यक्रमाचे उद्घाटन महामहीम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते होणार आहे.
कार्यक्रमासाठी योग्य स्थळ निश्चित करण्याच्या दृष्टीने केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी ७ फेब्रुवारी रोजी शेगाव शहरातील विविध ठिकाणांची पाहणी केली. यामध्ये संत गजानन महाराज इंजिनिअरिंग कॉलेज, देशमुख फार्म, तसेच विसावा परिसरातील जागेचा समावेश होता.
या पाहणीदरम्यान त्यांच्यासोबत राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी प्रत्येक स्थळाची पाहणी करून जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांसोबत सविस्तर चर्चा केली.
Users Today : 28