मध्यवर्ती बसस्थानकात कुष्ठरोग जनजागृती कार्यक्रम प्रवाशांना दिली आजाराविषयी माहिती; तज्ज्ञ डॉक्टरांची उपस्थिती

Khozmaster
1 Min Read

अकोला, दि. ८ (प्रतिनिधी) :
राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत अकोला शहरातील मध्यवर्ती बसस्थानकात कुष्ठरोग जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश समाजातील कुष्ठरोगाविषयीचे गैरसमज दूर करून लवकर तपासणी व वेळेवर उपचारासाठी नागरिकांना प्रोत्साहित करणे हा होता.

या जनजागृती कार्यक्रमाला बसस्थानक आगार प्रमुख सुभाष भिवटे, कुष्ठरोग विभागाचे सहायक संचालक डॉ. दिलीप रणमले, नागरी कुष्ठरोग पथक वैद्यकीय अधिकारी डॉ. धनंजय चिमणकर, तसेच कुष्ठरोग विभागाचे अधिकारी व कर्मचारी दिनेश गुल्हाणे, पालवे, भुसारे, शिंदे, उबरहंडे, ढोले, जाधव, भुजबटराव, जगताप, बोडखे, इंगळे, विजय कुळकर्णी, अभिमन्यू जेरपोतले यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन नंदू इंगळे यांनी केले.

बसस्थानकात आलेल्या प्रवाशांना कुष्ठरोगाची लक्षणे, उपचाराची उपलब्धता, तसेच हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो, याबाबत माहिती देण्यात आली. प्रवासी व नागरिकांना थेट संवादातून माहिती मिळावी, यासाठी हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात आला.

कार्यक्रमात कुष्ठरोग हा अनुवंशिक नसून जंतुसंसर्गामुळे होणारा आजार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. तसेच वेळीच निदान झाल्यास औषधोपचाराने पूर्णपणे बरा होतो, हे अधोरेखित करण्यात आले. यासोबतच सर्व सरकारी व निमसरकारी दवाखान्यांमध्ये मोफत तपासणी व उपचार उपलब्ध असल्याची माहितीही देण्यात आली.

कुष्ठमुक्त अकोला जिल्हा घडवण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन सहायक संचालक डॉ. दिलीप रणमले यांनी यावेळी केले.

0 9 4 8 5 6
Users Today : 28
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *