ओव्हरलोड वाहनांचा रस्त्याला ‘भार’! आरटीओंच्या ‘हलकेपणा’मुळे ‘वजनदार’ अपघाताचा धोका : कारवाईची जनतेला प्रतीक्षा

Khozmaster
3 Min Read

सचिन लहाने
बुलढाणा, दि. ९ :
जिल्ह्यात क्षमतेपेक्षा अधिक वजन वाहून नेणाऱ्या ओव्हरलोड मालवाहू वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे अशा वाहनांवर उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून (आरटीओ) कठोर कारवाई होत नसल्याने रस्त्यांची अवस्था खराब होत असून अपघाताचा धोका वाढत आहे.

जिल्ह्यातील कोणत्याही मार्गावरून प्रवास करताना ओव्हरलोड वाहने सहज दिसून येतात, मात्र आरटीओच्या अधिनस्त अधिकारी व पथके रस्त्यावर फिरताना क्वचितच दिसतात, अशी तक्रार सर्वसामान्य नागरिकांकडून होत आहे.

ओव्हरलोड वाहतुकीमुळे डांबरी तसेच सिमेंट काँक्रीट रस्त्यांचे नुकसान होत असून नागरिकांमध्ये “आरटीओंचा धाकच संपला की काय?” अशा उपहासात्मक प्रतिक्रिया उमटत आहेत.


अपघाताची शक्यता असूनही दुर्लक्ष का?

ओव्हरलोड वाहनांमुळे केव्हाही गंभीर अपघात घडण्याची शक्यता असते. तरीदेखील आरटीओ विभागाकडून या वाहतुकीकडे होत असलेले दुर्लक्ष हे ‘समझोत्याचे’ संकेत तर नाहीत ना? अशी शंका नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.


लहान वाहनांवर तत्काळ कारवाई, मग मोठ्यांवर का नाही?

लहान-सहान वाहनांवर नियमभंगासाठी तत्काळ कारवाई करणारे मोटार वाहन निरीक्षक व सहायक निरीक्षक ओव्हरलोड वाहनांवर कारवाई करण्यास टाळाटाळ का करतात? असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे.


राष्ट्रीय महामार्गांपासून गावकुसापर्यंत ओव्हरलोड वाहतूक

मुंबई–नागपूर राष्ट्रीय महामार्ग, पुणे–नागपूर महामार्ग, इतर राष्ट्रीय व राज्य मार्गांसह ग्रामीण भागातील अरुंद रस्त्यांवरही ओव्हरलोड वाहने सर्रास धावताना दिसून येतात.


पथके गायब, वाहनधारक निर्धास्त

मोटार वाहन निरीक्षकांची पथके रस्त्यावर नियमित तपासणीसाठी फिरताना दिसत नाहीत. त्यामुळे मालवाहू वाहनधारक क्षमतेपेक्षा जास्त भार भरून निर्धास्तपणे वाहतूक करीत आहेत.


‘कार्ड’वाल्यांना सूट? गरीबांवर टार्गेट?

विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार काही ठिकाणी मोटार वाहन निरीक्षक ‘कार्ड’ असलेल्या वाहनांकडे दुर्लक्ष करत असल्याचे सांगितले जाते. महिनाभराची यादी पाहूनच कारवाई केली जात असल्याचेही बोलले जाते. ‘कार्ड’वाले वगळता गरीब वाहनधारकांवरच टार्गेट करून कारवाई केली जाते, असा आरोप नागरिक करत आहेत.


बुलढाणा शहरातूनही जड वाहतूक सुरूच!

बुलढाणा शहरातूनही ओव्हरलोड वाहने सर्रास वाहतूक करीत असून चिखली मार्ग ते धाड मार्ग जोडणाऱ्या सर्क्यूलर रोडवरही ही वाहने धावताना दिसतात. हा भाग नेहमीच गर्दीचा असल्याने अपघाताची शक्यता अधिक आहे.

एखाद्या वेळी असे वजनदार वाहन पलटी झाले, तर मोठा अनर्थ घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. संभाव्य धोके लक्षात घेऊन तरी आरटीओ विभागाने कठोर कारवाई करावी, अशी अपेक्षा सुजाण नागरिक व्यक्त करीत आहेत.


टार्गेट असेल तरच कारवाई का?

शासनाकडून विविध नियमांनुसार कारवाईचे उद्दिष्ट दिले जाते. कारवाईतून महसूल वसुलीचेही टार्गेट असते. मग ही कारवाई केवळ उद्दिष्ट पूर्ण करण्यापुरतीच मर्यादित ठेवली जाते का? असा प्रश्न जिल्हाभर चर्चेत आहे.


जनतेचा सवाल : आरटीओ ‘वजनदार’ कारवाई कधी करणार?

जिल्ह्यात वाढत्या ओव्हरलोड वाहतुकीवर आरटीओ विभाग कधी कठोर आणि वजनदार कारवाई करणार? याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे.

0 9 4 0 1 9
Users Today : 9
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *