काळोना वाडी ग्रामस्थांचे फाट्यावर उपोषण स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही गाव महसूल नकाशाबाहेर रस्ता-पाणी-स्मशानभूमीचा प्रश्न ऐरणीवर

Khozmaster
2 Min Read

चिखली, दि. ९ (प्रतिनिधी) :
देश महासत्तेकडे वाटचाल करत असतानाच चिखली तालुक्यातील भरोसा भाग १ अंतर्गत येणाऱ्या काळोना वाडी येथील ग्रामस्थांना आजही आपल्या मूलभूत हक्कांसाठी व अस्तित्वासाठी संघर्ष करावा लागत आहे. गावाचे नाव महसूल नकाशावरच नसल्याने तसेच मूलभूत सुविधा न मिळाल्याने संतप्त ग्रामस्थांनी काळोना फाट्यावर उपोषण सुरू केले आहे.

१९ व्या शतकापूर्वीपासून वसलेले गाव असूनही महसूल अभिलेखात नाव नसणे ही गंभीर बाब असून, सोयी-सुविधांपासून गावाला जाणीवपूर्वक दूर ठेवले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. संतोष भुतेकर यांच्यासह अनेक ग्रामस्थ या उपोषणात सहभागी झाले आहेत.


तीन किलोमीटरचा रस्ता मृत्यूचा सापळा

या गावातील सर्वात मोठा प्रश्न म्हणजे काळोना वाडी ते काळोना पाटी या तीन किलोमीटर अंतराच्या रस्त्याची दयनीय अवस्था. काही वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेने टाकलेली गिट्टी व माती आता पूर्णतः वाहून गेली असून, साधे पायी चालणेही कठीण झाले आहे.

रात्री-अपरात्री एखादा आजारी पडल्यास त्याला रुग्णालयात नेणे म्हणजे मृत्यूशी झुंज देण्यासारखे असल्याचे ग्रामस्थ सांगतात. वेळेवर उपचार न मिळाल्याने वाटेतच मृत्यू झाल्याच्या घटना घडूनही संबंधित बांधकाम विभाग रस्त्याची जबाबदारी घेण्यास तयार नसल्याचा आरोप होत आहे.


पाणी व सुविधा जाणूनबुजून वगळल्याचा आरोप

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार केवळ रस्ताच नव्हे, तर पिण्याचे पाणी, सिंचन व इतर सुविधा यांपासूनही गावाला जाणीवपूर्वक दूर ठेवण्यात येत आहे. पाटबंधारे विभागाने खडकपूर्णा प्रकल्पाचे पाणी शेजारील गावांना दिले, मात्र काळोना वाडीच्या शेतकऱ्यांना त्यातून वगळण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.


स्मशानभूमीही नाही, ग्रामस्थ संतप्त

गावात स्वतंत्र स्मशानभूमी नसणे ही परिस्थिती अधिक गंभीर असून ही गावासाठी मोठी शोकांतिका असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. प्रशासकीय दिरंगाईला कंटाळून आता मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण मागे न घेण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे.


अधिकाऱ्यांनी दिल्या भेटी, मागण्यांवर ठाम

उपोषणस्थळी तहसीलदार गायकवाड, अंढेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार शेळके, राष्ट्रवादी नेते दराडे सर तसेच पाटबंधारे विभागाचे अभियंता पांडे यांनी भेट देऊन चर्चा केली.


या प्रमुख मागण्यांसाठी उपोषण

ग्रामस्थांच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत :
✅ काळोना पाटी ते काळोना वाडी रस्त्याचे डांबरीकरण
✅ शेतीसाठी खडकपूर्णा प्रकल्पाचे पाणी
✅ गावासाठी स्वतंत्र स्मशानभूमीची व्यवस्था
✅ काळोना वाडीचे नाव महसूल नकाशावर/पटलावर नोंदवणे

ग्रामस्थांनी स्पष्ट केले आहे की, मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण मागे घेतले जाणार नाही.

0 9 4 0 1 9
Users Today : 9
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *