दूषित पाण्याने घरोघरी अंगावर गुथी! हिवरा साबळेतील ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका आमदार सिद्धार्थ खरात यांनी केली विहीर व नळयोजनेची पाहणी जलशुद्धीकरण व नळयोजना नसल्याने ग्रामस्थांची गैरसोय

Khozmaster
2 Min Read

डोणगाव, दि. ९ (प्रतिनिधी) :
मेहकर तालुक्यातील हिवरा साबळे गावात विहिरीतील दूषित पाणी पिल्यामुळे ग्रामस्थांच्या अंगावर गुथी येत असल्याने एकच खळबळ उडाली आहे. गावकरी या प्रकारामुळे त्रस्त असून त्यांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे. गावात जलशुद्धीकरण यंत्रणा तसेच पाण्याची टाकी नसल्याने ग्रामस्थांना या संकटाला सामोरे जावे लागत आहे.

दरम्यान, या प्रकाराची माहिती मिळताच आमदार सिद्धार्थ खरात यांनी गावात जाऊन विहीर व नळयोजनेची पाहणी केली.


नळयोजना नसल्याने पाण्यासाठी मोठी गैरसोय

हिवरा साबळे व रत्नापूर ही गट ग्रामपंचायत असून या परिसराची लोकसंख्या सुमारे तीन हजार आहे. रत्नापूर गावात खासगी नळयोजना असली तरी हिवरा साबळे येथे केवळ नळांपर्यंत पाणी पोहोचविण्याची वितरण व्यवस्था आहे. मात्र संपूर्ण पाणीपुरवठा योजना नसल्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.


फिल्टर न करता तलावाचे पाणी विहिरीत, थेट नळाद्वारे पुरवठा

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार पाझर तलावातील पाणी कोणतेही जलशुद्धीकरण न करता थेट विहिरीत सोडले जाते. त्यानंतर त्याच विहिरीतून पाइपलाइनद्वारे गावात नळांमधून पाणीपुरवठा केला जातो. हे पाणी पिण्यात आल्याने मागील काही दिवसांपासून अनेक ग्रामस्थांच्या अंगावर गुथी येत असून काही नागरिक आजारीही पडले आहेत.


१४०० लोकसंख्या, मात्र वर्षानुवर्षे नळयोजना नाही

हिवरा साबळे गावाची लोकसंख्या सुमारे १४०० आहे. मागील अनेक वर्षांपासून गावात स्वतंत्र नळयोजना नाही. काही वर्षांपूर्वी अंतर्गत वितरण व्यवस्थेचे काम करण्यात आले, मात्र पाण्याची टाकी तसेच विंधन विहीर नसल्याने पाणीपुरवठा व्यवस्था अपुरी ठरत आहे.

परिणामी ग्रामस्थांना पाण्यासाठी शेतातील विहिरींवर अवलंबून राहावे लागत आहे. तलावातून विहिरीत पाणी सोडून ते नंतर नळाद्वारे पुरविले जाते. मात्र पाणी सोडण्यापूर्वी त्याचे कोणतेही जलशुद्धीकरण होत नाही, कारण त्या ठिकाणी जलशुद्धीकरण केंद्रच उभारण्यात आलेले नाही.

नाइलाजाने ग्रामस्थांना हे दूषित पाणी पिणे भाग पडत असून याचा थेट परिणाम त्यांच्या आरोग्यावर होत आहे.


तातडीच्या उपाययोजनांची मागणी

हिवरा साबळे येथील गंभीर पाणी प्रश्न लक्षात घेता शासन व प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

आमदार सिद्धार्थ खरात यांनी पाहणी केल्यानंतर ग्रामस्थांना तातडीने शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी आरओ प्लांट तत्काळ सुरू करावा, अशा सूचना प्रशासनास दिल्या आहेत.

0 9 3 7 5 9
Users Today : 17
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *