एमआयडीसीमधील पुठ्ठा निर्मितीच्या कारखान्याला भीषण आग कोट्यवधींचे नुकसान; आग विझविण्यासाठी १०० गाड्या पाणी वापरले

Khozmaster
2 Min Read

खामगाव, दि. ९ (प्रतिनिधी) :
खामगाव शहराजवळील एमआयडीसी परिसरात असलेल्या ओरिजन पॅक्स प्रायव्हेट लिमिटेड या पुठ्ठा निर्मिती करणाऱ्या कंपनीला ७ फेब्रुवारी रोजी रात्री दीड वाजताच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या भीषण आगीत कंपनीचे कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

घटनेची माहिती मिळताच तत्काळ खामगाव नगरपरिषद अग्निशमन विभागाला कळविण्यात आले. अग्निशमन विभागाच्या चार गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. नगरपरिषद अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. मात्र, आग वेगाने पसरत असल्याचे लक्षात येताच नगरपरिषदेचे अग्निशमन अधिकारी नागेश रोठे यांनी शेगाव, जळगाव जामोद, मलकापूर व बुलढाणा येथील अग्निशमन विभागाच्या अतिरिक्त गाड्या बोलावल्या.

आठ गाड्यांद्वारे पाण्याचा मारा

एकूण आठ अग्निशमन गाड्यांच्या मदतीने आग विझवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याचा मारा करण्यात आला. रात्री दीड वाजता लागलेली आग रविवारी दुपारी साडेबारा वाजता आटोक्यात आली.

या आगीत पुठ्ठा निर्मितीसाठी वापरण्यात येणारे कच्चे साहित्य तसेच मशिनरी पूर्णतः जळून खाक झाली. आगीची तीव्रता पाहता शेजारील कंपन्यांना आग लागू नये म्हणून अग्निशमन दलाने खबरदारी घेतली.

१०० गाड्या पाणी वापरले

अग्निशमन विभागाच्या माहितीनुसार, आग आटोक्यात आणण्यासाठी सुमारे १०० गाड्या पाणी लागले. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे सांगण्यात आले.


कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी दिली घटनास्थळी भेट

या घटनेची माहिती मिळताच कामगार मंत्री अॅड. आकाश फुंडकर यांनी मध्यरात्री घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. आगीची भीषणता लक्षात घेता त्यांनी प्रशासनाला योग्य त्या सूचना देऊन आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करण्याचे आदेश दिले.


0 9 2 9 4 5
Users Today : 6
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *