चिखली, (प्रतिनिधी) :
शहरातील प्रभाग क्रमांक ११ मधील विवेकानंदनगर, रेस्ट हाऊस मागील परिसरातील नर्मदेश्वर महादेव मंदिरात संत शिरोमणी गजानन महाराज प्रगटदिन भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हा प्रगटदिन उत्सव मागील २० वर्षांपासून स्व. सुभाष कोकाटे व कोकाटे परिवार यांच्या माध्यमातून नियमितपणे साजरा केला जात असून, त्यांच्या या निरंतर सेवाकार्याची परंपरा यावर्षीही चिरंजीव सागर कोकाटे व संपूर्ण कोकाटे परिवाराने पुढे नेली.
यावेळी सकाळी परिसरातील महिला मंडळाने एकदिवसीय संत गजानन महाराज विजय ग्रंथाचे पारायण केले. दुपारी खांडवा येथील प्रसिद्ध रामकथाकार अनिलानंद महाराज यांचे प्रवचन आयोजित करण्यात आले. प्रवचनात त्यांनी गजानन महाराजांचा प्रगटदिन व गुरूचे महत्त्व याविषयी उपस्थित भक्तांना मार्गदर्शन केले.
यावेळी बऱ्हाणपूरचे संगीत शिक्षक गजेंद्र साळुंके तसेच प्रसिद्ध पेटीवादक साळुंके बाबा यांनी भक्तीगीतांच्या माध्यमातून वातावरण भक्तिरसाने भारावून टाकले. त्यानंतर सायंकाळी आरती करून भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून आमदार श्वेताताई महाले, नगराध्यक्ष पंडित देशमुख, उपाध्यक्षा वैशाली कपिल खेडेकर, नगरसेवक दिपक वाधवाणी, भाजपा शहराध्यक्ष विजय वाळेकर, सुरेखा शिवराज पाटील, डॉ. रामेश्वर दळवी, मंगला झगडे, सुभाष झगडे, सुनील भवर, कैलास ठेंग, चेतन देशमुख, आशिष वाधवाणी आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भाजपा जिल्हा चिटणीस सचिन कोकाटे, उदय कोकाटे, हेमंत कोकाटे, सागर कोकाटे, ओम कोकाटे, तसेच संपूर्ण कोकाटे परिवार, प्रभागातील भक्तमंडळी, मित्रमंडळ व नागरिकांनी विशेष सहकार्य केले.
Users Today : 6