वर्दडी बुद्रुक, दि. ९ (प्रतिनिधी) :
येथून जवळ असलेल्या सोनोशी गावात श्री संत गजानन महाराज प्रगटदिनानिमित्त संगीत श्रीराम कथा, विजय ग्रंथ पारायण, कीर्तन व महाप्रसादाचा कार्यक्रम भक्तिमय वातावरणात पार पडला.
सोनोशी येथील पांडुरंग जायभाये हे गेल्या १४ वर्षांपासून संत गजानन महाराज प्रगटदिन मोठ्या उत्साहाने साजरा करीत असून, यावर्षीदेखील त्यांनी प्रगटदिनानिमित्त सप्ताहाचे आयोजन केले होते. या सप्ताहाचा प्रारंभ १ फेब्रुवारी रोजी करण्यात आला होता. सप्ताहाची सांगता ८ फेब्रुवारी रोजी काल्याचे कीर्तन व महाप्रसादाने करण्यात आली.
सप्ताहात दररोज सकाळी ७ ते ९ या वेळेत संत गजानन महाराज विजय ग्रंथाचे सामुदायिक पारायण करण्यात आले. दुपारी १ ते ४ या वेळेत रामायणाचार्य ह.भ.प. प्रेमानंद महाराज देशमुख यांच्या अमृतवाणीतून श्रीराम कथा संपन्न झाली.
सायंकाळी हरिपाठ आयोजित करण्यात आला. तसेच ७ फेब्रुवारी रोजी ह.भ.प. संतोष महाराज वनवे यांचे कीर्तन पार पडले. प्रगटदिनानिमित्त ह.भ.प. रमेश महाराज जायभाये (वैष्णवगड) यांचे काल्याचे कीर्तन झाले.
कीर्तनादरम्यान त्यांनी संत तुकाराम महाराजांच्या अभंगाद्वारे उपदेश करत भगवान श्रीकृष्ण व संत गजानन महाराजांचा महिमा कथन केला. त्यानंतर भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
या कार्यक्रमास माजी आमदार तोताराम कायंदे, माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर, प्रभाकर ताठे, डॉ. सुनील कायंदे, माजी सभापती डॉ. रामदास मुर्तडकर, गजेंद्र देशमुख, प्रविण गिते, शंकराव उगनमुगले यांच्यासह भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Users Today : 6