धामणगाव धाड येथे संत गजानन महाराज प्रगटदिन सोहळा उत्साहात महाआरती, पालखी मिरवणूक व भंडारा महाप्रसादाने भक्तिमय वातावरण

Khozmaster
1 Min Read

धामणगाव धाड, दि. ८ (प्रतिनिधी) :
विदर्भाची पंढरी आणि शेगावचे संत म्हणून ओळखले जाणारे संत शिरोमणी गजानन महाराज यांचा १४८ वा प्रगटदिन सोहळा धामणगाव धाड (ता. बुलढाणा) येथे मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला.

महाराष्ट्रासह देश-विदेशातील भाविकांकडून हा दिवस मोठ्या श्रद्धेने साजरा केला जातो. त्याच धर्तीवर धामणगाव धाड येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रगटदिनाचे औचित्य साधून संध्याकाळी भंडारा महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाची सुरुवात दुपारी संत गजानन महाराजांच्या नियोजित स्थळी ‘श्रीं’ची महाआरती करून करण्यात आली. त्यानंतर संपूर्ण गावातून वाजत-गाजत संत गजानन महाराजांच्या पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात आली.

या मिरवणुकीदरम्यान गावातील महिलांनी घरासमोर सुशोभित लांबलचक रांगोळ्या काढून परिसर सजविला. त्यामुळे संपूर्ण गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

टाळ-मृदंगाच्या गजरात ‘गण गण गणात बोते’, ‘श्री गजानन महाराज की जय’ या जयघोषाने आसमंत दुमदुमून गेला. पालखी मिरवणुकीत गावातील शेकडो महिला-पुरुष, लहान मुले तसेच भजनी मंडळ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

गावातील हे वातावरण पाहून जणू विदर्भाची पंढरी धामणगाव धाड येथेच अवतरली असल्याचा भास होत होता.

0 9 2 9 4 5
Users Today : 6
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *