बुलढाणा, दि. ७ (प्रतिनिधी) :
त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या १२८ व्या जयंतीनिमित्त समस्त उपासिका संघ व दि बुद्धिस्ट ग्लोबल चॅरिटेबल ट्रस्ट, बुलढाणा यांच्या वतीने गांधी भवन, जयस्तंभ चौक येथे महाराष्ट्रातील प्रसिद्ध गायक चेतन चोपडे यांच्या रमाई गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकराजा शाहू फाउंडेशनचे अध्यक्ष दादासाहेब काटकर हे होते. कार्यक्रमाचे उद्घाटन युवा सेनेचे नेते व नगरपरिषदेचे गटनेते मृत्युंजय गायकवाड यांनी केले.
कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून अॅड. जयश्रीताई शेळके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अलकाताई निकाळजे, प्रा. डी. एस. लहाने, शिवाजीराव तायडे, डॉ. शीतलताई नरवाडे, स्नेहाताई सिद्धार्थ भंडारे, दामोदर बिडवे, कुणाल पैठणकर, प्रा. राजेश खंडेराव आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपासिका संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विविध सांस्कृतिक व क्रीडात्मक स्पर्धांचे बक्षीस वितरण देखील करण्यात आले.
गायक चेतन चोपडे यांनी सादर केलेल्या ‘गुलमोहरी रूपाच्या भीमाला…’, ‘साजणी गुलमोहरी मिळाली…’, ‘एका चेहऱ्यात नऊ कोटी चेहरे…’, ‘रमा ऐसी बिलोरी मिळाली…’ या गीतांनी उपस्थित रसिकांची मने जिंकली. यासोबतच लहान चिमुकल्यांनीही रमाईंच्या जीवनावर आधारित गीते सादर करून कार्यक्रमात रंगत आणली.
या कार्यक्रमास बुलढाणा शहरातील विविध नगरातील उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे संचालन अस्मिता खंडेराव व अर्चना जाधव यांनी केले. प्रास्ताविक कुणाल पैठणकर यांनी मांडले, तर आभार प्रदर्शन अनुला क्षीरसागर यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी लता खिल्लारे, वैशाली अंभोरे, सुजाता हिवाळे, सुकेशनी खरात, वर्षा झिने, आशा सोनटक्के, रीता सपकाळ, सीमा जाधव, लक्ष्मी इंगळे, वैशाली जाधव, आम्रपाली वानखेडे, अनिता जाधव, रत्नमाला इंगळे, लक्ष्मीताई इंगळे, मनीषा चौतमोल तसेच समस्त उपासिका संघाच्या महिलांनी विशेष परिश्रम घेतले.
Users Today : 6