धाड, दि. ९ (प्रतिनिधी) :
सीमेवर देशाचे रक्षण करणाऱ्या **‘बॉम्बे इंजिनिअर ग्रुपट’**च्या जवानांची ‘सदा विजय’ रॅली धाडच्या पवित्र वेशीवर पोहोचताच गावकऱ्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. वीर जवानांच्या आगमनाने रक्तात संचारलेली देशभक्ती आणि माणुसकीची ओढ गावभर पसरली.
५ फेब्रुवारीच्या सायंकाळी जवानांच्या बुलेटचा आवाज घुमला आणि गाव रस्त्यावर उतरले. ‘आरंभ है प्रचंड’ व ‘ए वतन वतन मेरे’ सारखी देशभक्तीपर गीते, हवेत फडकणारा तिरंगा आणि जवानांच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास पाहून तरुणाई भारावून गेली.
६ फेब्रुवारीच्या सकाळी सूर्योदयासोबत हे जवान छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमले. अठरापगड जातींना एकत्र करून स्वराज्य निर्माण करणाऱ्या शिवछत्रपतींच्या पुतळ्याचे विधीवत पूजन करून महाआरती पार पडली. जवानांच्या हातातील आरती आणि निष्ठापूर्ण नजरेने उपस्थितांचे मन भावूक झाले.
यापुढे जवानांचा विशेष सत्कार धाड पोलीस स्टेशन आणि हनुमान मंदिरावर करण्यात आला. त्यानंतर ते मराठी प्राथमिक शाळेत पोहोचले, जिथे चिमुकल्यांनी देशसेवेचे महत्त्व समजून घेतले. जवानांनी शाळा व गावात मुलांशी संवाद साधत देशभक्तीची प्रेरणा दिली.
शेवटी, रॅलीत सामील जवानांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्धांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण केले. निवृत्त सैनिकांच्या प्रश्नांची माहिती मुख्यालयापर्यंत पोहचविण्याचे उद्दिष्ट घेऊन पुण्याहून निघालेली ही रॅली बीड, जालना मार्गे विदर्भात एन्ट्री करून गावकऱ्यांच्या मनात देशभक्तीची ज्वाला पेटवली.
धाडवासियांनी भावूक वातावरणात जवानांना निरोप देत ‘पुन्हा या…’ अशी साद घातली.
Users Today : 6