भरधाव ट्रकने परीक्षार्थी तरुणाला चिरडले अपघातात २१ वर्षीय तरुणाचा घटनास्थळीच मृत्यू; चिखली-बुलढाणा मार्गावरील मालगणी फाट्याजवळील घटना

Khozmaster
1 Min Read

चिखली, दि. १२ (प्रतिनिधी):
बुलढाणा येथे परीक्षा देण्यासाठी जात असलेल्या २१ वर्षीय तरुणाला भरधाव ट्रकने चिरडल्याची हृदयद्रावक घटना आज १२ फेब्रुवारी रोजी सकाळी सुमारे ९ वाजताच्या सुमारास चिखली-बुलढाणा मार्गावरील मालगणी फाट्याजवळ घडली. या भीषण अपघातात तरुणाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या प्रकरणी चिखली पोलिस ठाण्यात ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एकलारा (ता. चिखली) येथील रहिवासी शंतनू नारायण अंभोरे (वय २१) हा विद्यार्थी असून सध्या त्याच्या परीक्षा सुरू होत्या. आज १२ फेब्रुवारी रोजी तो सकाळी एमएच-२८-एजी-५४१७ क्रमांकाच्या दुचाकीने परीक्षा देण्यासाठी बुलढाणा येथे निघाला होता. सकाळी सुमारे ९.३० वाजताच्या दरम्यान शंतनू मालगणी फाट्याजवळ पोहोचताच समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

अपघात इतका भीषण होता की, शंतनूचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच नागरिकांची मोठी गर्दी जमली. परिणामी चिखली-बुलढाणा मार्गावर काही काळ वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली.

दरम्यान, माहिती मिळताच चिखली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. घटनास्थळ पंचनामा करून शंतनूचा मृतदेह शवविच्छेदनासाठी चिखली येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला.

0 9 4 8 5 4
Users Today : 26
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *