शिष्यवृत्तीचे तीन हजार अर्ज प्रलंबित महाविद्यालयस्तरावर कार्यवाही होत नसल्याने सामाजिक न्याय विभागाची नाराजी

Khozmaster
2 Min Read

बुलढाणा, दि. १२ (प्रतिनिधी):
महाडीबीटी पोर्टलवरील शिष्यवृत्तीचे तीन हजारांहून अधिक अर्ज संबंधित महाविद्यालय स्तरावर प्रलंबित असल्याचे समोर आले असून, याबाबत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने नाराजी व्यक्त केली आहे. महाविद्यालयांनी वेळीच आवश्यक कार्यवाही न केल्यास अनेक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात महाडीबीटी प्रणालीवर विविध शिष्यवृत्ती व सहाय्य योजना राबविण्यात येत आहेत. यामध्ये भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, मॅट्रिकोत्तर शिक्षण परीक्षा फी प्रदाने, राजश्री छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यवसाय पाठ्यक्रमाशी संलग्न वसतिगृहातील विद्यार्थ्यांना विद्यावेतन तसेच व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना यांचा समावेश आहे.

सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षातील प्रथम वर्ष व नूतनीकरण अर्ज नोंदणीसाठी महाडीबीटी पोर्टल ३० जून २०२६ पासून माहिती तंत्रज्ञान विभागाकडून सुरू करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी ऑनलाइन भरलेले अर्ज महाविद्यालय स्तरावर तपासून पुढील कार्यवाहीसाठी संबंधित कार्यालयाकडे सादर करणे आवश्यक आहे.

महाडीबीटी पोर्टलवरील डॅशबोर्डनुसार अनुसूचित जाती प्रवर्गातील एकूण १० हजार ९१७ अर्ज आजपर्यंत भरले गेले असून, त्यापैकी ३ हजार ५४ अर्ज महाविद्यालय स्तरावर प्रलंबित असल्याचे निदर्शनास आले आहे. विभागाकडून वारंवार सूचना देऊनही काही महाविद्यालयांकडून अर्ज तपासणी व सादरीकरण प्रक्रियेत दिरंगाई होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

यासंदर्भात सामाजिक न्याय विभागाने संबंधित महाविद्यालयांना तातडीने प्रलंबित अर्जांची तपासणी पूर्ण करून पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाइन पुढे पाठविण्याचे निर्देश दिले आहेत. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताच्या दृष्टीने अर्ज प्रक्रियेत कोणतीही अडचण येऊ नये यासाठी महाविद्यालयांनी तत्परता दाखवावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

0 9 4 8 5 4
Users Today : 26
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *