लोणार, दि. १२ (प्रतिनिधी):
तालुक्यातील टिटवी येथे सार्वजनिक शांतता व सुव्यवस्थेला बाधा पोहोचण्याची शक्यता निर्माण झाल्याने लोणार पोलीस ठाण्याने प्रतिबंधात्मक कारवाईचा अहवाल सादर केला आहे. या प्रकरणात टिटवी येथील रहिवासी शिवाजी किसन कोकाटे (वय २७) यांच्याविरुद्ध भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १२६ व १३५ अंतर्गत कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित व्यक्तीने सोशल मीडियावर आक्षेपार्ह व वादग्रस्त मजकूर प्रसारित केल्याने गावातील सरपंच, ग्रामसेवक तसेच नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. या प्रकारामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात आली.
दरम्यान, बुलढाणा येथील सायबर पोलीस स्टेशनकडे तक्रार प्राप्त झाल्यानंतर लोणार पोलिसांनी चौकशी करून प्रतिबंधात्मक अहवाल तयार केला. आरोपीकडून भविष्यात सार्वजनिक शांतता भंग होईल असे कोणतेही कृत्य घडू नये यासाठी त्याच्यावर बंधन घालण्यात येणार आहे.
या प्रकरणात आरोपीकडून तसेच दोन जामिनदारांकडून प्रत्येकी २ लाख रुपयांचा जामीननामा घेण्याचा प्रस्ताव करण्यात आला आहे. तसेच जामिनदार हे नातलग नसावेत, ते भारतीय नागरिक असावेत आणि आरोपीवर पूर्ण नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी जामिनदारांची राहील, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.
Users Today : 26