बुलढाणा (प्रतिनिधी):
बुलढाणा शहरातील सर्क्युलर रोडवरील चिंचोले चौक परिसरात असलेल्या एका अकॅडमीमध्ये क्लाससाठी गेलेली २० वर्षीय तरुणी संशयास्पदरीत्या बेपत्ता झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी तरुणीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून बुलढाणा शहर पोलिसांनी मिसिंगची नोंद केली आहे.
शहरातील शिवशंकरनगर परिसरात कुटुंबीयांसह राहणारी सलोनी सुरेंद्र वानखेडे (वय २०) ही तरुणी चिंचोले चौक परिसरातील एका अकॅडमीमध्ये नियमितपणे क्लाससाठी जात होती. १० फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास ती नेहमीप्रमाणे क्लासला जात असल्याचे सांगून घरातून बाहेर पडली. मात्र, ती दुपारपर्यंत घरी परतली नाही.
यानंतर सलोनीच्या आईने दुपारी सुमारे १.३० ते २ वाजेच्या दरम्यान तिच्या मोबाइलवर वारंवार कॉल केले असता मोबाइल बंद असल्याचे दिसून आले. पुढे कुटुंबीयांनी अकॅडमी गाठून चौकशी केली तसेच नातेवाईक, मित्र आणि मैत्रिणींकडेही विचारपूस केली. मात्र सलोनीचा कोणताही ठावठिकाणा लागला नाही.
या प्रकरणी तरुणीच्या आईने बुलढाणा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी मिसिंगची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.
Users Today : 26