ऊसतोड मजुराच्या अपहरणप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल पैशांच्या व्यवहारातून अपहरण; रात्रभर कारमध्ये डांबून ठेवून मारहाण केल्याचा आरोप

Khozmaster
2 Min Read

मेहकर, दि. १२ (प्रतिनिधी):
तालुक्यातील जानेफळ पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या देऊळगाव साकर्षा-पारखेड परिसरातून ऊसतोड मजुराचे अपहरण केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पैशांच्या व्यवहारातून हा प्रकार घडल्याचा आरोप असून अपहृत मजुराला रात्रभर कारमध्ये डांबून ठेवून मारहाण व जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

सावरगाव (जि. अकोला) येथील रहिवासी देविदास सूर्यभान राठोड (वय ५०) हे ७ फेब्रुवारी रोजी दुपारी सुमारे २.३० वाजता पारखेड फाट्याजवळ काम करत असताना आरोपी शामराव बाबुसिंग राठोड, संदीप जाधव, तेजराव राठोड व धोडीराम जाधव (सर्व रा. पारखेड) यांनी घटनास्थळी येऊन “ऊस तोडीचा हिशोब करायचा आहे, आमच्यासोबत चल,” असे सांगितले.

मात्र देविदास राठोड यांनी सोबत जाण्यास नकार दिल्यावर आरोपींनी त्यांना जबरदस्तीने उचलून कारमध्ये कोंबले व अज्ञात ठिकाणी घेऊन गेले. त्याठिकाणी “तू आमच्याकडून एक लाख रुपये उचल घेतली आहेस, ती परत दे किंवा काम पूर्ण कर,” अशी मागणी केल्याचे सांगण्यात आले.

देविदास राठोड यांनी “मी यापूर्वीच ३० हजार रुपये दिले असून कामही पूर्ण केले आहे,” असे सांगितल्याने आरोपी संतप्त झाले. त्यानंतर आरोपींनी त्यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून रात्रभर कारमध्ये डांबून ठेवले. तसेच पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे.

दरम्यान, ८ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजताच्या सुमारास लघुशंकेचे निमित्त करून देविदास राठोड यांनी आरोपींच्या ताब्यातून पळ काढला.

या प्रकरणी देविदास राठोड यांच्या फिर्यादीवरून जानेफळ पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १४०(३), ११५(२), ३५१(२), ३५२ तसेच कलम ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार अतुल पचार करीत आहेत.

0 9 4 8 5 4
Users Today : 26
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *