मेहकर (प्रतिनिधी):
शासकीय कर्तव्य बजावत असलेल्या पोलीस अंमलदाराची कॉलर पकडून धक्काबुक्की करीत सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याची धक्कादायक घटना मेहकर शहरातील वाटिका चौक परिसरात घडली. या प्रकरणी मेहकर पोलिसांनी तीन आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
मेहकर पोलीस स्टेशनमध्ये नेमणुकीस असलेले पोलीस अंमलदार शिवाजी श्रीराम चिमणे हे ११ फेब्रुवारी रोजी रात्री १०.१५ ते १०.३० वाजेदरम्यान वाटिका चौकात शासकीय कर्तव्य बजावत होते. यावेळी एमएच-२८-बीएच-६६६८ क्रमांकाच्या होंडा शाईन दुचाकीवर ट्रिपल सीट बसून आरडाओरड करत जाणाऱ्या तरुणांना त्यांनी समज देण्याचा प्रयत्न केला.
मात्र, या तरुणांनी पोलिसांना मग्रुरी दाखवत गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. आरोपी मुजाहीद मुकददर कुरेशी याने पोलीस अंमलदार चिमणे यांची कॉलर पकडून धक्काबुक्की केली. त्याच्यासोबत असलेल्या शेख बिलाल शेख अयाज आणि रेहान वाजीद कुरेशी यांनी अश्लील शिवीगाळ करत लोटपाट केली.
घटनेदरम्यान उपस्थित नागरिकांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी त्यांच्याही अंगावर धावून जात परिसरात गोंधळ घातल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी पोलीस अंमलदार चिमणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मेहकर पोलिसांनी आरोपी मुजाहीद मुकददर कुरेशी (वय १८, रा. इमामवाडा, मेहकर), शेख बिलाल शेख अयाज (वय १८, रा. इमामवाडा, मेहकर) व रेहान वाजीद कुरेशी (वय १८, रा. माळीपेठ, मेहकर) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १३२, २९६, ११५(२), ३(५) तसेच मोटार वाहन कायदा कलम १२८(१) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
Users Today : 26