खेळाडूंच्या पथसंचलनात आकर्षक देखाव्यांचा सामाजिक संदेश जिल्हा परिषद विभागीय क्रीडा-सांस्कृतिक महाकुंभाचा शानदार प्रारंभ; पाच जिल्ह्यांच्या ११५० खेळाडूंचे लक्षवेधी सादरीकरण

Khozmaster
2 Min Read

बुलढाणा, दि. १२ (प्रतिनिधी):
जिल्हा क्रीडा संकुल येथे आजपासून सुरू झालेल्या तीन दिवसीय जिल्हा परिषद विभागीय क्रीडा व सांस्कृतिक महाकुंभाच्या उद्घाटन सोहळ्यात सहभागी खेळाडूंच्या पथसंचलनाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. उद्घाटन समारंभास उपस्थित मान्यवरांना मानवंदना देताना खेळाडू पथकांनी विविध सामाजिक संदेश देणारे आकर्षक देखावे सादर केल्याने हा सोहळा संस्मरणीय ठरला.

अकोला, बुलढाणा, वाशीम, अमरावती आणि यवतमाळ या पाच जिल्हा परिषदांमधील सुमारे ११५० खेळाडूंनी आपल्या पथसंचलनातून विविध सामाजिक आशयाधारित विषयांवर अनुरूप वेशभूषा, रंगभूषा, संगीत व संवादाच्या माध्यमातून सादरीकरण केले. या पथसंचलनाने उपस्थितांच्या मनाचा ठाव घेतला.

उद्घाटन समारंभ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात यांच्या अध्यक्षतेखाली तर जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते पार पडला. त्यानंतर पाचही जिल्ह्यांच्या पथकांनी मानवंदना दिली.


अकोल्याचा लोककलेचा जागर

सर्वप्रथम अकोला जिल्हा परिषद पथकाने महाराष्ट्रातील लोककलेचा जागर केला. कीर्तन, पोवाडा, भारूड, लावणी, कोळी नृत्य, वारली नृत्य, वाघ्या-मुरळी अशा विविध लोककलेचे सादरीकरण करून महाराष्ट्राच्या समृद्ध लोकसंस्कृतीचे दर्शन घडविले.


बुलढाण्याचा मराठी भाषेच्या संवर्धनाचा संदेश

बुलढाणा जिल्हा परिषद पथकाने मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर शासनाचे आभार व्यक्त करत मराठी भाषा, साहित्य व संस्कृतीचे संवर्धन करण्याचा संदेश दिला. तसेच मराठी शाळांची गरज व भूमिका अधोरेखित करणारे प्रभावी सादरीकरण या पथकाने केले.


अमरावतीची शेगावीची वारी आणि सेवाभावाचे दर्शन

अमरावती जिल्हा परिषद पथकाने संत गजानन महाराजांच्या भूमीत होत असलेल्या या महोत्सवाच्या अनुषंगाने अमरावती ते बुलढाणा अशी शेगावीची वारी सादर केली. वारकरी संप्रदाय, वारीची परंपरा, तसेच श्रीक्षेत्र शेगाव येथील संत गजानन महाराज संस्थानमार्फत यात्रेकरूंना उपलब्ध अन्नछत्र, निवास व्यवस्था, सेवाभावी वृत्ती, स्वच्छता व स्वयंशिस्त या बाबींचे प्रभावी दर्शन घडविले. या देखाव्यामुळे उपस्थित मान्यवरही भारावून गेले.


वाशीमचा छत्रपती संभाजी महाराजांचा स्वाभिमानी देखावा

वाशीम जिल्हा परिषद पथकाने छत्रपती संभाजी महाराज व कवी कलश यांच्यातील संवाद तसेच त्याग आणि बलिदान दर्शविणारा जाज्वल्य मराठी स्वाभिमानाचा ऐतिहासिक देखावा सादर केला. या सादरीकरणाने उपस्थितांमध्ये राष्ट्रभक्ती व प्रेरणेची भावना जागृत झाली.


यवतमाळचा सामाजिक विषमतेवर प्रहार करणारा हृदयस्पर्शी संदेश

यवतमाळ जिल्हा परिषद पथकाने सामाजिक विषमता व दारिद्र्याचे विदारक चित्रण सादर करत संत गाडगेबाबांचा “भुकेल्याला अन्न द्या” हा संदेश प्रभावीपणे मांडला. या संवेदनशील सादरीकरणामुळे उपस्थितांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या.

0 9 4 8 5 4
Users Today : 26
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *