बुलढाणा :
विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत ‘शून्य विद्युत अपघात’ हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी महावितरणने राज्यातील सर्व उपविभाग व शाखा कार्यालयांमध्ये प्रत्येक सोमवारी किंवा आठवड्याच्या पहिल्या दिवशी कामाची सुरुवात विद्युत सुरक्षा शपथेने करण्याचे निर्देश परिपत्रकाद्वारे नुकतेच दिले आहेत. कर्मचाऱ्यांच्या मानसिकतेत विद्युत सुरक्षिततेचे महत्त्व रुजवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी ‘शून्य विद्युत अपघात’ उद्दिष्टाची प्रभावी व सातत्यपूर्ण अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांनी विद्युत सुरक्षेच्या उपाययोजना व लोकसहभागातील उपक्रमांना वेग दिला आहे.
लोकेश चंद्र यांनी सांगितले की, विद्युत सुरक्षा ही केवळ नियमावली नसून अभियंते व कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन कामाचा अविभाज्य भाग आहे. प्रत्येक जीव मौल्यवान असल्याने शून्य विद्युत अपघात हेच महावितरणचे ध्येय आहे. त्यामुळे विद्युत सुरक्षेचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे.
विद्युत सुरक्षेबाबत सजगता वाढवण्यासाठी महावितरणच्या ६६४ उपविभाग व ३२९१ शाखा कार्यालयांमध्ये प्रत्येक सोमवार ‘सुरक्षा दिवस’ म्हणून निश्चित करण्यात आला आहे. या दिवशी अभियंते व तांत्रिक कर्मचारी सकाळी कामाची सुरुवात सुरक्षा शपथेने करतात. त्यानंतर सर्व तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक सुरक्षा उपकरणे व तांत्रिक साधनांची तपासणी केली जाते. उपकरणे सुस्थितीत असल्याची खात्री झाल्यानंतरच क्षेत्रीय कामांना सुरुवात केली जाते.
तसेच तांत्रिक कर्मचाऱ्यांसोबत होणाऱ्या सर्व बैठकींची सुरुवातदेखील आता विद्युत सुरक्षा शपथेनेच करण्यात येणार आहे. या उपक्रमांच्या अंमलबजावणीसाठी सुरक्षा अधिकारी म्हणून मंडलस्तरावर कार्यकारी अभियंता (प्रशासन) आणि विभागस्तरावर अतिरिक्त कार्यकारी अभियंता यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
केंद्रीय विद्युत प्राधीकरणाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार महावितरणने कर्मचाऱ्यांसह नागरिकांच्या विद्युत सुरक्षेसाठी विविध उपक्रमांना गती दिली आहे. जून २०२५ मध्ये महावितरणच्या २० व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यभर विद्युत सुरक्षा जनजागृती अभियान राबविण्यात आले होते. या अभियानात २ लाख ११ हजारांहून अधिक नागरिक, शालेय विद्यार्थी, अभियंते, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. तसेच २ कोटी ८५ लाख वीजग्राहकांना विद्युत सुरक्षेचा थेट वैयक्तिक संदेश देण्यात आला होता. या अभियानाची जागतिक स्तरावर नोंद घेण्यात आली.
Users Today : 15