समाजात सकारात्मकता निर्माण झाल्यास धर्म आराधना वृद्धिंगत होते

Khozmaster
2 Min Read

लोणार, दि. १२ (प्रतिनिधी) :
गावात गुरुभगवंतांचे आगमन होण्यासाठी पुण्यसंचय लागतो. लोणारकर पुण्यवान असल्यामुळेच येथे जैन साधू-संतांना येण्याची संधी मिळत आहे. धार्मिक कार्य करताना केवळ परंपरा जपणे पुरेसे नसून समर्थनभाव आणि एकोप्याची भावना वाढवणे आवश्यक आहे. समाजात सकारात्मकता निर्माण झाली तरच खरी धर्मआराधना वृद्धिंगत होते, असे प्रतिपादन प.पू. चैतन्यश्री मारासा यांनी केले.

स्थानिक गेलडा भवन येथे आयोजित धर्मसभेत त्या बोलत होत्या. तरुण पिढीने आधुनिकतेसोबत आध्यात्मिक मूल्ये जपावीत, संयम, सदाचार आणि सेवाभाव यांच्या आधारे समाजाची उन्नती साधावी, असे आवाहन त्यांनी केले.

लोणारमध्ये चैतन्यश्री मारासा यांचे आगमन

सुमारे सहा वर्षांनंतर प.पू. चैतन्यश्री मारासा यांचे गुरुवारी सकाळी ८.३० वाजता कीन्ही मार्गे लोणार शहरात आगमन झाले. त्यांच्यासोबत प.पू. जिग्याजी मारासा, प.पू. सुबोधीजी मारासा, प.पू. निर्मितीजी मारासा (ठाणा-४) उपस्थित होत्या.

त्यांच्या स्वागतासाठी सकल जैन समाज बांधवांसह विविध समाजातील नागरिक, नगरपालिकेचे नगराध्यक्ष व नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहरात प्रवेश करताच ठिकठिकाणी फुलांची उधळण, मंगलवाद्ये आणि जयघोषात त्यांचे भावपूर्ण स्वागत करण्यात आले.

आगमनानंतर गेलडा भवन येथे प्रवचनाचे आयोजन करण्यात आले. होळी चातुर्मास निमित्त प.पू. साध्वी महाराज सुमारे दीड महिना लोणार येथे वास्तव्यास राहणार असून या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रम, प्रवचने आणि आध्यात्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

२५व्या दीक्षा दिवसानिमित्त रौप्य महोत्सवाचे आयोजन

येत्या २४ व २५ फेब्रुवारी २०२६ रोजी त्यांच्या २५व्या दीक्षा दिवसानिमित्त रौप्य महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने विशेष प्रवचने, गुरुभक्ती, सामूहिक उपासना तसेच विविध आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यभरातून साधू-साध्वी, धर्मगुरू व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

0 9 4 8 4 3
Users Today : 15
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *