चिखली, दि. १२ (प्रतिनिधी) :
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ संलग्नित गावंडे कॉलेज ऑफ फार्मसी, साखरखेडी यांच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे दि. १ ते ८ फेब्रुवारी २०२५ दरम्यान दत्तक ग्राम मोहाडी (ता. सिंदखेड राजा) येथे आयोजित विशेष श्रमसंस्कार शिबिराचा यशस्वी समारोप झाला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नेहरू युवा क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या अध्यक्षा प्रा. डॉ. मिनल गावंडे होत्या. मार्गदर्शक म्हणून प्राचार्य डॉ. नीलेश गावंडे व प्रभारी प्राचार्य आमोल जाधव उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून नेहरू युवा क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या युवा संचालिका इशा गावंडे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रांजली ठाकरे तसेच सहायक कार्यक्रम अधिकारी अस्लम पठाण यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्रा. डॉ. मिनल गावंडे यांनी शारीरिक श्रमांची प्रतिष्ठा, स्वच्छतेची सवय आणि व्यक्तीचा सर्वांगीण विकास घडविण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना व श्रमसंस्कार शिबिरांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले.
प्रमुख मार्गदर्शक प्राचार्य डॉ. नीलेश गावंडे यांनी सामाजिक जबाबदारीची भावना, श्रमसंस्कृती आणि सर्वांगीण प्रगती साधण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना हे उपयुक्त माध्यम असल्याचे अधोरेखित केले. प्रास्ताविकातून रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रांजली ठाकरे यांनी विशेष श्रमसंस्कार शिबिरामुळे विद्यार्थी जीवनात घडणारे सकारात्मक बदल स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे संचालन आकांक्षा चौधरी यांनी केले, तर आभार प्रदर्शन शिवम इंगळे यांनी मानले.
या शिबिरात स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, जलव्यवस्थापन, आरोग्य तपासणी, महिला सक्षमीकरण, व्यसनमुक्ती जनजागृती, बौद्धिक सत्रे व सांस्कृतिक कार्यक्रम यांसारखे विविध उपक्रम राबविण्यात आले.
Users Today : 4