जनतेच्या हितासाठी ग्रामपंचायतीचे अस्तित्व स्वतंत्र ठेवण्याचा ठराव बुलढाणा नगरपालिकेच्या हद्दवाढीला सागवन ग्रामस्थांचा तीव्र विरोध

Khozmaster
2 Min Read

बुलढाणा, दि. १२ (प्रतिनिधी)
गावाच्या तसेच जनतेच्या हितासाठी सागवन ग्रामपंचायतीचे अस्तित्व स्वतंत्र ठेवावे, असा ठराव मंजूर करत सागवन ग्रामस्थांनी बुलढाणा नगरपालिकेच्या हद्दवाढीला तीव्र विरोध दर्शविला आहे. या संदर्भातील निर्णयाविरोधात आवाज उठवण्यासाठी सागवन येथे ग्रामस्थांची निष्पक्ष व निर्भीड बैठक पार पडली.

बैठकीत विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. मौजे सागवन ग्रामपंचायत क्षेत्रात जांभरुण गावाचाही समावेश असून, समाजमाध्यमातून तसेच मा. उच्च न्यायालय नागपूर येथे दाखल रिट याचिका क्रमांक ४७८९/२०२५ मधील दि. १९/०१/२०२६ च्या निर्णयावरून जिल्हाधिकारी बुलढाणा यांनी हद्दवाढीचा प्रस्ताव शासनाकडे सादर केल्याचे समोर आले. या प्रस्तावात सागवन व जांभरुणचा समावेश करण्यात आला आहे.

मात्र, ग्रामस्थांनी स्पष्टपणे भूमिका मांडताना सांगितले की, सागवन-जांभरुण ग्रामपंचायतीचा नगरपालिकेत समावेश हा कायदा व नियमांचे उल्लंघन करणारा असून ग्रामस्थांची कोणतीही मागणी नसताना हा निर्णय लादण्याचा प्रयत्न सुरू आहे.

याबाबत ग्रामस्थांनी सांगितले की, दि. २८ जुलै २०२१ रोजी ग्रामपंचायत सागवनच्या सर्वसाधारण सभेत ठराव क्रमांक ८ अन्वये बुलढाणा नगरपरिषद हद्दवाढीमध्ये सामील न करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तसेच दि. २ ऑक्टोबर २०२१ रोजी ग्रामसभेत ठराव क्रमांक ४ पारित करून ग्रामपंचायतीचे अस्तित्व स्वतंत्र ठेवण्याचा निर्णय घेतला होता.

ग्रामस्थांनी पुढे नमूद केले की, नगरपरिषद बुलढाणाने दि. २९ डिसेंबर २०२० रोजी घेतलेला सर्वसाधारण सभेतील ठराव क्रमांक ३४ हा नियमबाह्य असून नगरपरिषदेला स्वतःची हद्दवाढ करून घेण्याचा कोणताही अधिकार नाही.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, सदर हद्दवाढ प्रस्तावाचा सातत्याने पाठपुरावा सुरू असून तो अंतिम टप्प्यात पोहोचत आहे. मात्र, या प्रक्रियेत ग्रामस्थांची भावना व भूमिका जाणून घेण्याचा कोणताही प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात आलेला नाही.

या माध्यमातून गावावर सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक व प्रशासकीय गुलामगिरी लादण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी यावेळी तीव्र निषेध व्यक्त केला. तसेच सागवन गावाची पूर्वापार असलेली ओळख कायम ठेवून नगरपालिकेत समाविष्ट करू नये, अशी मागणी करण्यात आली.

0 9 3 0 5 4
Users Today : 3
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *