मलकापूर, दि. १२ (प्रतिनिधी) –
मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या वडोदा रेल्वे स्टेशन परिसरातून पुन्हा एक २० वर्षीय तरुणी संशयास्पदरीत्या बेपत्ता झाल्याची घटना उघडकीस आली असून या प्रकरणी मलकापूर ग्रामीण पोलिसांत मिसिंग दाखल करण्यात आली आहे.
मध्य प्रदेश राज्यातील सिधी गावचे रहिवासी कमलेश कोल (वय ४२) हे मजुरीचा व्यवसाय करतात. गेल्या काही महिन्यांपासून ते मजुरीच्या कामासाठी वडोदा रेल्वे स्टेशन परिसरात वास्तव्यास आहेत. दरम्यान, काही खासगी कामानिमित्त कमलेश कोल हे त्यांच्या मूळ गावी सिधी (मध्य प्रदेश) येथे गेले होते. यावेळी त्यांची मुलगी आसमी कोल ही तिच्या मावशीकडे राहत होती.
दि. ८ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास, आसमी कोल ही कोणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेली. त्यानंतर नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला, मात्र तिचा कुठेही पत्ता लागला नाही.
या प्रकरणी कमलेश कोल यांनी दि. ११ फेब्रुवारी रोजी मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी मिसिंगची नोंद केली आहे.
बेपत्ता तरुणीचे वर्णन पुढीलप्रमाणे आहे –
आसमी कोल हिचा रंग गोरा, उंची ५ फूट, चेहरा गोल, कपाळ उंच, मध्यम बांधा असून ती बेपत्ता होताना गुलाबी रंगाचा टी-शर्ट व काळ्या रंगाची जीन्स पॅन्ट परिधान केलेली होती.
सदर वर्णनाची तरुणी कुठे दिसून आल्यास किंवा तिच्याबाबत काही माहिती मिळाल्यास मलकापूर ग्रामीण पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
Users Today : 3