मलकापूर, दि. १२ (प्रतिनिधी) –
शहरातील बँक ऑफ महाराष्ट्र समोरून दुचाकी चोरी झाल्याच्या प्रकरणात चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाला असतानाही तो अद्याप मलकापूर शहर पोलिसांच्या हाती लागलेला नाही. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
संबंधित दुचाकी चोरी प्रकरणातील चोरटा अकोला येथील असल्याची माहिती मलकापूर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी मोबाईलद्वारे दिल्याचे समजते. तसेच वाहन मालकाला दुचाकी लवकर परत मिळेल, असा दिलासा शहर पोलिसांकडून देण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्षात कारवाई करण्यात दिरंगाई होत असल्याचा आरोप केला जात आहे.
वाहन चोरीच्या तपासासाठी नेमण्यात आलेल्या तपास अधिकाऱ्यांना वारंवार विनंती करूनही त्यांनी कारवाईकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप असून, आर्थिक हितसंबंध जोपासून जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे काय? असा सवालही उपस्थित करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये पोलिसांविरोधात तीव्र रोष निर्माण झाला आहे.
दरम्यान, मलकापूर शहरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीमुळे नागरिकांच्या मालमत्तेची व सुरक्षिततेची हमी राहिलेली नसल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा संघटक डॉ. सुभाष तलरेजा यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे चिंता व्यक्त केली आहे.
Users Today : 4