रायपूर, दि. १३ (प्रतिनिधी)
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत मंजूर झालेल्या घरकुलांच्या अनुदानाचा पुढील हप्ता मिळत नसल्याने रायपूर येथील लाभार्थ्यांनी गुरुवारी (दि. १३) सकाळी दहा वाजता बसथांब्याजवळ रास्ता रोको आंदोलन केले. अनुदानाचा एकच हप्ता मिळाल्याने घरकुलाचे बांधकाम रखडले असून आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याची भावना लाभार्थ्यांनी व्यक्त केली.
सरकारकडून नवीन घरकुल बांधून देण्याचे काम सुरू झाल्यानंतर लाभार्थ्यांनी आपली जुनी घरे पाडली. मात्र, पुढील अनुदान न मिळाल्याने घरकुलांचे काम अपूर्ण राहिले आहे. त्यामुळे अनेक लाभार्थ्यांना भाड्याच्या खोल्यांमध्ये राहावे लागत असून त्यासाठी अतिरिक्त खर्च करावा लागत आहे. परिणामी, दैनंदिन मोलमजुरीवर अवलंबून असलेल्या कुटुंबांवर आर्थिक संकट ओढावले आहे.
हे आंदोलन ग्रामपंचायत सदस्य नीलेश राजपूत आणि शमीम सौदागर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. “घरकुलाचे अनुदान तातडीने द्या” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. आंदोलनाची तीव्रता वाढल्याने अधिक ग्रामस्थ घटनास्थळी जमले.
आंदोलनामुळे बुलढाणा, चिखली, सैलानी आणि दुधा मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी रायपूर पोलीस प्रशासनही घटनास्थळी दाखल झाले.
लाभार्थ्यांनी अनुदानाचे उर्वरित हप्ते तातडीने वितरित करून घरकुलांचे काम पूर्ण करण्याची मागणी केली आहे. अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
Users Today : 5