हिवरा साबळे येथील पाणीप्रश्न गंभीर पाण्यासाठी महिलांची पायपीट; दूषित पाण्याने ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात

Khozmaster
2 Min Read

डोणगाव, दि. १३ (प्रतिनिधी)

मेहकर तालुक्यातील हिवरा साबळे गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून, ग्रामपंचायत प्रशासनाने जलशुद्धीकरण न करताच पाझर तलावातील पाणी थेट नागरिकांना पिण्यास दिल्याने गावात त्वचारोगाचा प्रादुर्भाव झाल्याची बाब समोर आली आहे. आरोग्य विभागाच्या पथकाने तपासणी केल्यानंतर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून दूषित पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. मात्र, पाणीपुरवठा बंद झाल्यामुळे गेल्या चार दिवसांपासून गावात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे.

दूषित पाणीपुरवठ्यामुळे गावातील जवळपास प्रत्येक घरातील सदस्यांना त्वचारोगाची लागण झाल्याचे सांगण्यात येत आहे. या संदर्भातील वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर १० फेब्रुवारी रोजी आरोग्य विभागाने हिवरा साबळे येथे तीन पथके पाठवून तपासणी केली. तपासणीनंतर कोणत्याही प्रकारे फिल्टर न केलेले अशुद्ध पाणी पुरविल्यामुळे गावात जलजन्य रोगाचा उद्रेक होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. त्यानंतर ग्रामपंचायतीने सरळ धरणातून येणारे पाणी गावात सोडणे बंद केले.

महिलांना १ ते २ किमी अंतरावरून पाणी आणावे लागत

गावात पिण्याचे पाणी उपलब्ध नसल्याने महिलांना एक ते दोन किलोमीटर अंतरावर शेतातील विहिरींवरून डोक्यावर दोन-दोन हंडे घेऊन पाणी आणावे लागत आहे. त्यामुळे महिला व ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

जुन्या नळयोजनेच्या विहिरीवरून पाणीपुरवठ्याचे प्रयत्न

हिवरा साबळे येथे सन २००० मध्ये नळयोजना मंजूर झाली होती. त्या योजनेसाठी गौंडाळा येथील धरणाच्या पायथ्याशी एक विहीर आणि धरणाच्या वरच्या बाजूस एक विहीर अशा दोन विहिरींचे बांधकाम करण्यात आले होते. आता या जुन्या विहिरींमधून पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी ग्रामपंचायतीने काम हाती घेतले आहे. येत्या काही दिवसांत या विहिरींमधून पाणी गावात पोहोचण्याची शक्यता आहे.

0 9 3 0 7 9
Users Today : 5
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *