खामगाव प्रतिनिधी :
जातनिहाय जनगणनेच्या राजपत्रातील सूचीत ओबीसींचा स्पष्ट उल्लेख नसल्याच्या निषेधार्थ राष्ट्रीय ओबीसी महासंघाने खामगाव येथील एसडीओ कार्यालयासमोर निदर्शने केली. जिल्हाध्यक्ष गणेश चौकसे आणि युवा जिल्हाध्यक्ष सूरज बेलोकार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.
केंद्र सरकारने अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) यांच्यासोबत ओबीसींचीही जातनिहाय जनगणना करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार २२ जानेवारी रोजी राजपत्र जारी करून जनगणनेसाठी ३३ सूचीत समाविष्ट करण्यात आल्या. मात्र बाराव्या क्रमांकाच्या सूचीत SC आणि ST चा स्पष्ट उल्लेख असताना इतरांसाठी ‘अन्य’ असा शब्द वापरण्यात आला आहे. ओबीसींचा थेट उल्लेख टाळल्याने समाजात संभ्रम निर्माण झाल्याचा आरोप महासंघाने केला आहे.
युवा जिल्हाध्यक्ष सूरज बेलोकार यांनी केंद्र सरकारवर ओबीसी समाजासोबत दगाबाजी केल्याचा आरोप करत, राजपत्रात ‘इतर मागासवर्गीय (OBC)’ असा स्पष्ट उल्लेख करण्याची मागणी केली.
देशभरात जातनिहाय जनगणनेची मागणी विरोधी पक्षांकडून सातत्याने होत होती. संसदेतील विरोधी पक्षनेत्यांनीही लोकसंख्येनुसार समाजघटकांचे योगदान समोर यावे, अशी भूमिका मांडली होती. त्यानंतर ३० मे २०२५ रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत जातनिहाय जनगणनेचा निर्णय घेण्यात आला होता. केंद्रीय रेल्वे व माहिती-प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती जाहीर केली होती.
१६ जून २०२५ रोजी जाहीर केलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर २०२६पासून जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये जनगणना सुरू होणार असून उर्वरित देशात मार्च २०२७पासून प्रक्रिया सुरू होणार आहे. रजिस्ट्रार जनरल व जनगणना आयुक्तांनी त्यानंतर अधिसूचना काढली. ७ जानेवारीला राजपत्र प्रसिद्ध झाले आणि २२ जानेवारीला ३३ सूची अंतिम करण्यात आल्या.
या सूचीत घर क्रमांक, कुटुंबातील व्यक्तींची संख्या, पिण्याचे पाणी, वीज, शौचालय, इंटरनेट, मोबाइल, वाहन आदी बाबींचा समावेश आहे. मात्र जातवर्गीकरणाच्या बाबतीत ओबीसींचा स्पष्ट उल्लेख नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
निवेदन देताना राज्य संघटक विजय डवंगे, युवा जिल्हा कार्याध्यक्ष उमेश इंगळे, मुस्लिम आघाडी जिल्हाध्यक्ष तहसीन शाह, जिल्हा सहसंघटक गजानन कर्डे, जिल्हा उपाध्यक्ष योगेश डांगे, युवा तालुकाध्यक्ष गजानन रोकडे, दीपक महाजन यांच्यासह मोठ्या संख्येने ओबीसी बांधव उपस्थित होते.
जनगणनेच्या सूचीत ‘ओबीसी’चा स्पष्ट उल्लेख नाही; राजपत्रात दुरुस्तीची मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे एसडीओ कार्यालयासमोर निदर्शने
0
9
4
8
4
3
Users Today : 15
Leave a comment