भूमिअभिलेख कर्मचाऱ्यांचा एल्गार संपाच्या इशाऱ्याने कामकाजावर परिणाम; मोजणी साहित्य जमा करून काळ्या फिती

Khozmaster
2 Min Read

सिंदखेड राजा प्रतिनिधी :
विविध प्रलंबित मागण्यांवर शासनाकडून सकारात्मक निर्णय होत नसल्याने भूमिअभिलेख विभागातील कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. महाराष्ट्र भूमिअभिलेख कर्मचारी कृती समिती च्या नेतृत्वाखाली राज्यभरातील कर्मचाऱ्यांनी १८ फेब्रुवारी रोजी मोजणी साहित्य कार्यालयात जमा करून काळ्या फिती लावून कामकाज केले. यामुळे विभागीय कामकाजावर परिणाम जाणवू लागला आहे.
सिंदखेड राजा व देऊळगाव राजा तालुक्यातील भूमिअभिलेख कर्मचारीही या आंदोलनात सहभागी झाले आहेत. भूमिअभिलेख विभागाच्या इतिहासात प्रथमच राज्यातील कर्मचारी एकाच छताखाली एकत्र आल्याचे चित्र दिसून येत आहे.
तांत्रिक वेतनश्रेणीची प्रमुख मागणी
भूमिअभिलेख विभागातील भूकरमापक हे विभागाचा कणा मानले जातात. जमिनीची मोजणी, नकाशे अद्ययावत करणे, शासकीय दस्तऐवजांची अचूक नोंद ठेवणे अशी तांत्रिक व जबाबदारीची कामे ते करतात. भूकरमापक पदासाठी अभियांत्रिकी पदवी किंवा पदविका ही शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आली आहे.
वन विभाग व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत भूकरमापकांना तांत्रिक वेतनश्रेणी लागू असताना भूमिअभिलेख विभागात मात्र लिपिकवर्गीय वेतन दिले जात असल्याची तक्रार कर्मचाऱ्यांनी केली आहे. प्रशासकीय न्यायाधिकरणाने (मॅट) कर्मचाऱ्यांच्या बाजूने निकाल दिला असतानाही शासनाने तांत्रिक वेतनश्रेणी लागू केली नसल्याने असंतोष वाढला आहे.
आंदोलनाची पुढील रुपरेषा
१८ फेब्रुवारी: मोजणी साहित्य जमा करून काळ्या फिती लावून काम
२० फेब्रुवारीपासून: मोजणी काम बंद
२३ ते २६ फेब्रुवारी: सामूहिक रजा
२७ फेब्रुवारी: पुणे येथे जमाबंदी आयुक्त कार्यालयावर आक्रोश मोर्चा
२ मार्चपासून: मागण्या मान्य न झाल्यास राज्यव्यापी बेमुदत संप
निवेदन देताना सिंदखेड राजा व देऊळगाव राजा येथील मुख्यालय सहायक मारोती थोरवे, गोपाल वाघमारे, श्रीकांत बुलबुले, सुनीता खडसे, प्रकाश शिंदे, भूमापक रमेश शिंदे, राजेंद्र गहेराव आदी कर्मचारी उपस्थित होते.

0 9 4 8 4 0
Users Today : 12
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *