खामगाव प्रतिनिधी :
शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत एका तरुणीच्या घरावर दगडफेक करण्यात आल्याने ती जखमी झाली. १७ फेब्रुवारी रोजी रात्री सुमारे साडेनऊ ते दहा वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली.
माहितीनुसार, फरशी भागातील भुसारा गल्ली येथे राहणारी भूमिका राजेश जोशी (वय २०) ही तरुणी घराबाहेर उभी असताना अज्ञात व्यक्तीने तिच्या दिशेने दगड फेकला. दगड खांद्यावर लागल्याने ती जखमी झाली. तत्काळ तिच्यावर वैद्यकीय उपचार करण्यात आले.
फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, मागील दोन-तीन दिवसांपासून त्यांच्या घराच्या दिशेने वारंवार दगडफेक होत होती. या प्रकरणात बोरीपुरा परिसरातील एका तरुणावर संशय व्यक्त करण्यात आला असून तो व त्याचे काही सहकारी दगडफेक करत असावेत, असा आरोप करण्यात आला आहे.
या घटनेची नोंद १८ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री १२.०५ वाजता शिवाजीनगर पोलीस स्टेशन, खामगाव येथे करण्यात आली. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम १२५ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
वैयक्तिक वादातून घटना
घटना शहरात पसरल्यानंतर काही समाजकंटकांनी तिला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली. दोन समाजांमध्ये वाद झाल्याच्या तसेच धार्मिक स्थळावर हल्ला झाल्याच्या अफवा सोशल मीडियावर पसरल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
पोलीस निरीक्षक सुरेंद्र अहेरकर यांनी स्पष्ट केले की, हा प्रकार पूर्णपणे वैयक्तिक वादातून घडलेला असून त्याचा कोणत्याही धार्मिक स्थळाशी किंवा दोन समाजांशी संबंध नाही. संबंधित संशयिताला ताब्यात घेऊन चौकशी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेवू नये, कोणतीही संशयास्पद माहिती आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. सायबर सेल सोशल मीडियावरील हालचालींवर लक्ष ठेवून असून अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
खामगावात घरावर दगडफेक; तरुणी जखमी संशयितावर गुन्हा दाखल; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे पोलिसांचे आवाहन
0
9
4
8
4
0
Users Today : 12
Leave a comment