बँक ऑफ महाराष्ट्र चा ‘अंध’ कारभार? पासबुक दुरुस्तीसाठी अंध विद्यार्थ्याला तीन दिवस हेलपाटे; पत्रकार आल्यावर पाच मिनिटांत काम पूर्ण

Khozmaster
2 Min Read

बार्शीटाकळी प्रतिनिधी :
बँकेच्या कामासाठी ग्राहकांना तासनतास ताटकळत ठेवण्याचे प्रकार नवे नाहीत; मात्र बार्शीटाकळी येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेने संवेदनशीलतेच्या मर्यादा ओलांडल्याचा आरोप होत आहे. पीएचडीसाठी नोंदणी करणाऱ्या जलालाबाद येथील एका प्रज्ञाचक्षु विद्यार्थ्याला साध्या पासबुक दुरुस्तीसाठी तब्बल तीन दिवस हेलपाटे मारावे लागल्याची घटना समोर आली आहे.
उच्चशिक्षित अंध युवक आपल्या शिष्यवृत्ती प्रक्रियेसाठी आवश्यक असलेल्या पासबुकवरील नाव दुरुस्तीसाठी शुक्रवार, १३ फेब्रुवारी रोजी शाखेत गेला होता. आधार कार्डवरील नावाप्रमाणे दुरुस्ती करण्याची विनंती त्याने व्यवस्थापकांकडे केली. मात्र “अर्ज देऊन जा, सोमवार या” असे सांगून त्याला परत पाठवण्यात आले.
सोमवारी पुन्हा शाखेत गेल्यावर “प्रिंटर बंद आहे, अकोल्याला जाऊन प्रिंट काढून घ्या” असे उत्तर देण्यात आल्याचा आरोप आहे. दिव्यांग ग्राहकाचे काम प्राधान्याने व्हायला हवे, अशी सूचना सामाजिक कार्यकर्त्यांनी केली; तरीही उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याचे सांगितले जाते.
पत्रकार आल्यावर बदलले चित्र
घटनेची माहिती सामाजिक कार्यकर्ते संघपाल वाहूरवाघ व पत्रकार श्याम ठक यांना मिळाल्यानंतर त्यांनी शाखेत जाऊन विचारणा केली. दरम्यान, विद्यार्थ्याचा फोटो व बँकेतील कारभाराचे चित्रण सुरू होताच काही वेळापूर्वी ‘प्रिंटर बंद’ असल्याचे सांगणाऱ्या कर्मचाऱ्यांनी अवघ्या पाच मिनिटांत पासबुक दुरुस्त करून दिल्याचा दावा करण्यात आला आहे.
प्रतिक्रिया
संघपाल वाहूरवाघ (सामाजिक कार्यकर्ते):
“जिद्दीने शिक्षण घेणाऱ्या अंध विद्यार्थ्याला अशी वागणूक देणे लाजिरवाणे आहे. आम्ही हस्तक्षेप केला नसता तर त्याला अकोल्याला जावे लागले असते. जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई व्हायला हवी.”
नागेश कैलास उपरवट (विद्यार्थी):
“सामाजिक कार्यकर्ते आले नसते तर मला पासबुक मिळाले नसते. बँकांनी दिव्यांगांना प्राधान्य द्यावे.”
शाखा व्यवस्थापकांनी मात्र “प्रिंटर बंद असल्यामुळे १३ फेब्रुवारी रोजी काम होऊ शकले नाही” असे स्पष्टीकरण दिले आहे.
या घटनेमुळे बँकिंग सेवांमधील दिव्यांगांसाठीच्या सुविधा आणि संवेदनशीलतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

0 9 4 8 4 0
Users Today : 12
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *