मोताळा प्रतिनिधी :
मोताळा येथील स्व. बी. डी. विद्यालयाचे कलाशिक्षक सुनील खर्चे यांचा मुलगा अथर्व खर्चे याने कागदाच्या तब्बल ४८० तुकड्यांवर साकारलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य रेखाचित्रामुळे जागतिक पातळीवर मान्यता मिळवली आहे. त्याच्या या कलाकृतीची नोंद International Book of Records मध्ये करण्यात आली होती. आता त्याची नोंद ‘ऑक्सफोर्ड बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्येही झाली असल्याने मोताळा तालुका आणि बुलढाणा जिल्ह्यासाठी ही अभिमानाची बाब ठरली आहे.
अथर्व सुनील खर्चे हा अभियांत्रिकी पदवीधर असून, वडील कलाशिक्षक असल्याने चित्रकलेचा गुण त्याला घरातूनच लाभला आहे. शिवजयंतीच्या निमित्ताने त्याने ए-४ आकाराच्या ४८० कागदांपासून तब्बल २० फूट उंच आणि १० फूट रुंद असे भव्य रेखाचित्र साकारले. ही कलाकृती पूर्ण करण्यासाठी त्याला २४ दिवस रात्रंदिवस परिश्रम घ्यावे लागले.
१८ फेब्रुवारी २०२५ रोजी शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला त्याने ही कलाकृती आपल्या घराच्या गच्चीवर प्रदर्शित केली. ती पाहण्यासाठी तालुक्यातील शिवप्रेमींनी मोठी गर्दी केली होती. सोशल मीडियावरही ही कलाकृती मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली.
अथर्वला इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्सकडून प्रमाणपत्र व पदक देऊन गौरविण्यात आले. तसेच त्याने Guinness World Records मध्येही नोंदणी केली आहे.
‘आपणही काहीतरी वेगळे आणि छंदाशी निगडित रेकॉर्ड करावे, या प्रेरणेतून मी शिवरायांचे भव्य छायाचित्र रेखाटले. त्याची जागतिक स्तरावर दखल घेतली जाणे ही अभिमानास्पद बाब आहे,’ अशी भावना अथर्व खर्चे यांनी व्यक्त केली.
या यशामुळे मोताळा तालुक्याचे नाव राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकले आहे.
अथर्वने रेखाटलेल्या शिवरायांच्या छायाचित्रांची जागतिक दखल
0
9
3
2
3
4
Users Today : 9
Leave a comment