बुलढाणा जिल्ह्यात २४ तासांत तीन तरुणी बेपत्ता चिखलीत अल्पवयीन मुलीचे अपहरण प्रकरण; जलंब व जळगाव जामोद येथे मिसिंग दाखल

KHOZ MASTER
3 Min Read

मलकापूर, दि. १८ (बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी)

जिल्ह्यात महिला व तरुणी बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असताना गेल्या २४ तासांत तीन स्वतंत्र घटना समोर आल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. चिखली, जलंब आणि जळगाव जामोद पोलिस ठाण्यांत संबंधित प्रकरणी मिसिंग तसेच अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

चिखली येथे अल्पवयीन विद्यार्थिनी बेपत्ता; अपहरणाचा गुन्हा दाखल

देऊळगाव माळी (ता. मेहकर) येथील प्रल्हाद दिगंबर भराड यांची १७ वर्ष ८ महिने वयाची मुलगी रेवती भराड ही बारावीची परीक्षा देण्यासाठी चिखली येथील शिवाजी कॉलेजमध्ये गेली होती. मात्र ती परीक्षा केंद्रावर पोहोचली नसल्याचे लक्षात आल्यानंतर तिच्या वडिलांनी महाविद्यालय परिसरात शोध घेतला. सर्वत्र चौकशी करूनही तिचा पत्ता न लागल्याने त्यांनी चिखली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

तक्रारीनुसार अज्ञात इसमाने लग्नाचे किंवा अन्य आमिष दाखवून फूस लावून पळवून नेल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १३७ (२) अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास महिला पोलीस हवालदार सूर्यकला म्हस्के करीत आहेत.

भास्तन (ता. शेगाव) येथील १९ वर्षीय तरुणी बेपत्ता

जलंब पोलिस स्टेशन हद्दीतील भास्तन (ता. शेगाव) येथील गौरी भागवत मिरगे (वय १९) ही १६ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास कोणालाही न सांगता घरातून निघून गेली. तिचा भाऊ कार्तिक मिरगे यांनी मित्रपरिवार व नातेवाईकांकडे चौकशी केली; मात्र काहीही माहिती मिळाली नाही.

गौरीची उंची सुमारे ५ फूट, रंग सावळा, चेहरा गोल, बांधा सडपातळ असून अंगात पंजाबी ड्रेस व पायात काळ्या रंगाची चप्पल असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी जलंब पोलिसांत मिसिंग दाखल करण्यात आली आहे. संबंधित मुलीबाबत माहिती मिळाल्यास जलंब पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन तपास अधिकारी पोलीस अंमलदार राजेश हिवाळे यांनी केले आहे.

आसलगाव (ता. जळगाव जामोद) येथील २१ वर्षीय तरुणी बेपत्ता

आसलगाव (ता. जळगाव जामोद) येथील देविदास शंकर मसुरकार यांची मुलगी रोहिणी मसुरकार (वय २१) ही १५ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री सुमारे १२.३० वाजता घराबाहेर गेली. बराच वेळ उलटूनही ती परत न आल्याने कुटुंबीयांनी रात्रभर शोध घेतला; मात्र तिचा माग काढता आला नाही.

रोहिणीची उंची १६३ सें.मी., रंग गोरा, चेहरा गोल, काळे लांब केस आहेत. अंगात पिवळ्या रंगाचा टॉप व कथिया रंगाची सलवार-ओढणी असून मानेच्या उजव्या बाजूस तिळ आहे. या प्रकरणी जळगाव जामोद पोलिस ठाण्यात मिसिंग दाखल करण्यात आली असून पुढील तपास पोलीस अंमलदार उमेश शेगोकार करीत आहेत.

पालकांमध्ये चिंता; पोलिसांकडून तपास वेगात

सलग घडलेल्या या घटनांमुळे जिल्ह्यातील पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिस प्रशासनाने नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता कोणतीही ठोस माहिती तात्काळ संबंधित पोलिस ठाण्याला कळवावी, असे आवाहन केले आहे.

0 9 3 2 3 4
Users Today : 9
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *