पातूर, दि. १८ (प्रतिनिधी):
“ॐ नमः शिवाय शांताय कारणत्रय हेतवे…” या मंत्रोच्चारात सालाबादप्रमाणे यंदाही श्री काशी कवळेश्वर महादेव मंदिर येथे महाशिवरात्री महोत्सव मोठ्या भक्तिभावात साजरा करण्यात आला. हा महोत्सव श्री काशी कवळेश्वर भजन मंडळ तसेच समस्त शिवभक्त मंडळ यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.
प्रातःकाळी रुद्राभिषेक व महाआरतीने उत्सवाची सुरुवात झाली. सकाळपासूनच महादेवाच्या दर्शनासाठी भक्तांनी मोठ्या प्रमाणात रांगा लावल्या होत्या. शिवरात्री उपवासानिमित्त भाविकांना उपवासाचे लाडू, चहा व साबुदाण्याची उसळ असा प्रसाद देण्यात आला.
सकाळपासूनच भजन मंडळाच्या वतीने शिवनामाचा अखंड गजर सुरू होता. शिवभजने आणि खंजिरीच्या खणखणाटाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. भक्तांनी अमृततुल्य भजनांचा लाभ घेत आध्यात्मिक वातावरणाचा अनुभव घेतला.
चिंचखेड शेत शिवारातील दुर्गम व निसर्गरम्य परिसरात वसलेले हे अति पुरातन मंदिर शहराच्या दक्षिणेकडे एकांत स्थळी आहे. या मंदिरात दर सोमवारी हरिनाम स्मरण व पंचपदी आरतीची परंपरा रूजविण्याचे कार्य भूविकास बँकेचे व्यवस्थापक स्वर्गीय दत्तात्रय गिरोलकर, शामरावजी गिहे, प्रल्हाद यादव, नामदेव फुलारी, भानुदास तेजवाल, लक्ष्मण गुजर, बळीराम सातव, रामभाऊ ढगे, मधुकर सुरवाडे, पंजाबराव सुरवाडे, सुरेश कोथळकर, जयवंत पुरुषोत्तम आदींनी केले.
बोर्डी नदीला पूर असो वा नैसर्गिक आपत्ती, कोणत्याही संकटाची पर्वा न करता सलग चाळीस वर्षे ही भजन परंपरा कायम ठेवण्यात आली. पुढील पिढीनेही दर सोमवारी ही परंपरा सुरू ठेवली आहे.
महाशिवरात्री निमित्त हजारो भक्त येथे दर्शनासाठी येतात. सध्या मंदिरापर्यंत दुचाकी व चारचाकी वाहनांनी पानद रस्ता तसेच बाहेरील महामार्गावरून थेट पोहोचण्याची सोय उपलब्ध आहे.
पातूर येथे काशी कवळेश्वर महादेव मंदिरावर शिवनामाचा अखंड गजर
0
9
3
2
3
4
Users Today : 9
Leave a comment