वरूड प्रतिनिधी :
सकाळची कोवळी उन्हे अंगावर घेत, नवीन स्वप्ने आणि दिवसाच्या कामाचे नियोजन मनात ठेवून घराबाहेर पडलेल्या पाच जणांवर बुधवारी काळाने झडप घातली. वरूड-राजुरा बाजार मार्गावर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळच्या शिवाई बस आणि ऑटोरिक्षा यांच्यात झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला.
या दुर्घटनेत हरिभाऊ शिंदे, कैलास नागदेवे, जनार्दन नागदेवे, राजकुमार भलावी यांच्यासह इयत्ता सातवीत शिकणारी १३ वर्षीय माही हिचा समावेश आहे. या अपघाताने केवळ पाच देह शांत झाले नाहीत, तर पाच हसती-खेळती घरे एका क्षणात उद्ध्वस्त झाली.
शिक्षणाची जिद्द घेऊन निघालेली माही काळाच्या पडद्याआड
रात्री आई-वडिलांच्या कुशीत गप्पा मारत झोपलेली माही सकाळी डबा घेऊन शाळेसाठी निघाली होती. प्राथमिक शाळेतील ही हुशार विद्यार्थिनी उमलण्यापूर्वीच नियतीने हिरावून घेतली. “आई, मी येते” असे म्हणत घराबाहेर पडलेली माही आता कधीच परतणार नाही, या कल्पनेने तिचे कुटुंब स्तब्ध झाले आहे.
संसाराचा गाडा ओढणारे हात थांबले
दोन महिन्यांपूर्वीच नवीन ऑटोरिक्षा घेऊन संसार उभा करण्याच्या ध्येयाने झटणारे कैलास नागदेवे यांचाही या अपघातात मृत्यू झाला. पत्नी आणि दोन मुलांसाठी कष्ट करणारे हे मनमिळाऊ व्यक्तिमत्त्व कायमचे निघून गेले.
जनार्दन नागदेवे हे वरूड येथे एका ड्रायव्हिंग स्कूलमध्ये उमेदवारांना प्रशिक्षण देत होते. नेहमीप्रमाणे ते ऑटोरिक्षाने कामावर जात असताना अपघातात मृत्यूमुखी पडले.
वाडेगावात शोककळा
मृतांपैकी तिघे जण वाडेगाव येथील रहिवासी होते. त्याच दिवशी गावातील एका महिलेचा वृद्धापकाळाने मृत्यू झाला. एकाच दिवशी गावातील चार जणांच्या निधनामुळे वाडेगावात शोककळा पसरली आहे.
अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती. या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे
Users Today : 9