अमरावती प्रतिनिधी :
सिपना अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय येथे ‘सिपना शिवमहोत्सव २०२६’चे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने शहरातून भव्य रॅली काढण्यात येणार आहे.
सायन्सस्कोर शाळेच्या प्रांगणातून रॅलीला सुरुवात होऊन शिवटेकडी, गर्ल्स हायस्कुल चौक, गणेशदास राठी चौक, इर्विन, राजकमल व राजापेठ मार्गे सिपना कॉलेजपर्यंत रॅली पोहोचणार आहे.
रॅलीमध्ये बुलेटस्वार विद्यार्थिनी, झेंडेधारी मावळे विशेष आकर्षण ठरणार आहेत. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेशात मेहदीप पारखे, जिजाऊंच्या रूपात ईशा डंबाले आणि सईबाईच्या वेशभूषेत उन्नती चौधरी सहभागी होणार आहेत.
महाविद्यालयात बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत प्राचार्य डॉ. संजय खेरडे यांनी याबाबत माहिती दिली. संस्थाध्यक्ष जगदीश गुप्ता हे रॅलीतील चारचाकी वाहनावर उपस्थित राहणार आहेत.
राजकमल चौकात ढोल पथक वादन, फ्लॅश मॉब आणि लाठी-काठीचे प्रात्यक्षिक सादर करण्यात येणार आहे. कॉलेज परिसरात घोड्यावर शिवाजी महाराज व संभाजी महाराजांची, तर दमणीत जिजाऊ व सईबाईंची ढोलताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात येईल.
शिवचरित्रकार प्रा. गजानन देशमुख यांचे ‘मी रायगड बोलतोय’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. तसेच अदिती बोरेकर दिग्दर्शित ‘शिव गर्जना’ हे नाट्य सादर होणार आहे.
पत्रकार परिषदेला संस्थेचे उपाध्यक्ष अजय श्रॉफ, डॉ. प्रवीण मळसने, शिव महोत्सव प्रभारी प्रा. अमित शाह, हर्ष रामटेके, रवी इंगळे, स्नेहल वासनकर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राजक्ता मुंडे, मनस्वी देशमुख, भावेश रायके, गायत्री जाधव, राजनंदिनी, तन्वी देशमुख आदी विद्यार्थी कार्यरत आहेत.
Users Today : 9