डोणगाव प्रतिनिधी :
ग्रामपंचायत कारभारातील अनियमितता, वसुलीच्या रकमेतील अपहार, मनमानी व अनागोंदी कारभाराच्या आरोपांवरून डोणगाव ग्रामपंचायतीने दोन लिपिकांना सेवेतून बडतर्फ केले आहे. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून ग्रामपंचायत अधिकाऱ्यांवरही कारवाईची टांगती तलवार आहे.
अमोल धोटे यांनी नोव्हेंबर २०२५ मध्ये ग्रामपंचायत कारभाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची तक्रार केली होती. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी चौकशी समिती नेमली. समितीने ३० जानेवारी रोजी अहवाल सादर केला. या अहवालात ग्रामपंचायत अधिकारी व्ही. के. दांडगे यांच्याविरुद्ध गंभीर बाबी नमूद करण्यात आल्या. जिल्हा परिषद सेवा १९६४ च्या नियम (३) नुसार कारवाईचे निर्देश देण्यात आले होते, मात्र त्यानुसार कार्यवाही झालेली नाही.
आर्थिक अनियमिततेचे आरोप
तक्रारीनुसार —
सामान्य निधीतील रोजची वसुली ग्रामनिधीत जमा न करता परस्पर खर्च करण्यात आली.
८८ हजार २५५ रुपये नियमबाह्य खर्च झाल्याचे आढळले.
एकच बँक खाते असणे बंधनकारक असताना तीन वेगवेगळ्या खात्यांमध्ये रक्कम ठेवण्यात आली.
नमुना क्रमांक ५ मधील नोंदीत गंभीर त्रुटी, रोकड वहीवरील स्वाक्षरीत बदल व २० ते २४ ऑगस्ट २०२५ मधील अपूर्ण नोंदी निदर्शनास आल्या.
पंधराव्या वित्त आयोगाच्या मानधन खर्चात अनियमितता आढळली.
नमुना ५ व ७ मधील रकमेतील तफावत ८१ हजार ३४२ रुपये होती.
३६ हजार ४९६ रुपयांच्या नोंदी आढळल्या नाहीत.
२०२३-२४ च्या लेखापरीक्षणात १ लाख १० हजार ४२ रुपये वसूलपात्र रक्कम खात्यात न भरता खर्च केल्याचे निष्पन्न झाले.
अखेर बडतर्फीचा आदेश
ग्रामपंचायत कामकाज नियमानुसार न केल्याच्या गंभीर बाबी लक्षात घेऊन १८ फेब्रुवारी रोजी ग्रामपंचायत अधिकारी व सरपंच यांच्या आदेशाने लिपिक श्याम खोटे व प्रदीप परमाळे यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले.
दरम्यान, जिल्हा पातळीवरील चौकशी समितीने दोषी ठरवलेल्या ग्रामपंचायत अधिकाऱ्यांवर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सर्व दोष सिद्ध होऊनही संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होत नसल्याने त्यांना कुणाचे अभय आहे का, अशी चर्चा गावात रंगली आहे.
डोणगाव ग्रामपंचायतीचे दोन कर्मचारी बडतर्फ
0
9
4
8
4
0
Users Today : 12
Leave a comment