देऊळगाव महीजवळ मद्यधुंद चालकामुळे ५७ प्रवाशांचा जीव धोक्यात

KHOZ MASTER
2 Min Read

देऊळगाव मही प्रतिनिधी :
दारूच्या नशेत बस चालवत ५७ प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण केल्याचा धक्कादायक प्रकार देऊळगाव महीजवळ उघडकीस आला. मात्र वाहकाने प्रसंगावधान राखत बस सुरक्षित थांबविल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
Maharashtra State Road Transport Corporationच्या बुलढाणा आगाराची लातूर–बुलढाणा ही बस (एमएच-२०-जीसी-२५९४) चालक मनोज बंड व वाहक ए. एच. पवार यांच्या ताब्यात होती. बीड, अंबड, जालना मार्गे देऊळगाव राजा मार्गे परतीच्या प्रवासात देऊळगाव महीनजीक बसचा वेग वळणांवर अनियंत्रित होत असल्याचे प्रवाशांच्या लक्षात आले.
काही वेळातच चालकाच्या हालचाली व बोलण्यात संशयास्पद बदल जाणवू लागले. बस देऊळगाव मही येथे पोहोचताच चालक मद्यप्राशन केलेल्या अवस्थेत असल्याचा संशय बळावला.
वाहकाचे प्रसंगावधान
स्थितीचे गांभीर्य ओळखून वाहकाने तत्काळ बस सुरक्षितस्थळी थांबवली. प्रवाशांना खाली उतरवून वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. काही प्रवाशांनी सांगितले की, बस काही ठिकाणी हेलकावे खात होती, त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
बस थांबताच प्रवासी संतप्त झाले व चालकावर कठोर कारवाईची मागणी करू लागले. मद्यप्राशन करून सार्वजनिक वाहन चालवणे हा गंभीर गुन्हा असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी दिली.
दीड तास ताटकळ, पुढील प्रवास दुसऱ्या बसने
घटनेनंतर सामाजिक कार्यकर्ते किशोर शिंगणे व आदित्य चोपडे यांच्यासह अन्य नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रवाशांना तब्बल दीड तास प्रतीक्षा करावी लागली. अखेर पंढरपूर–बुलढाणा बस आल्यानंतर प्रवाशांना पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आले.
वरिष्ठांची दखल
चिखली आगारप्रमुख जोगदंडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न झाला; मात्र प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर विभाग नियंत्रक शुभांगी शिरसाट यांनी तत्काळ दखल घेत वाहन परीक्षकांना पाठवले. संबंधित चालकास ताब्यात घेऊन Deulgaon Raja Police Station येथे तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील कारवाई सुरू आहे.
प्रशासनावर प्रश्नचिन्ह
या घटनेमुळे आगार प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. चालकांची नियमित वैद्यकीय तपासणी व अल्कोहोल चाचणी केली जाते का? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे.

0 9 4 8 3 8
Users Today : 10
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *