प्रल्हाद महाराजांच्या जन्मोत्सव सोहळ्याची सांगता साखरखेर्डा नगरीतून भव्य रथोत्सव मिरवणूक

KHOZ MASTER
2 Min Read

साखरखेर्डा प्रतिनिधी :
येथील प. पू. प्रल्हाद महाराज रामदासी यांच्या जन्मोत्सव सोहळ्याची सांगता भव्य रथोत्सव मिरवणूक व महाप्रसाद वितरणाने उत्साहात करण्यात आली. आठ दिवस चाललेल्या या दासनवमी महोत्सवात महाराष्ट्रभरातून हजारो भाविक सहभागी झाले होते.
रथोत्सवाची मंगल सुरुवात
सकाळी संस्थानातून रथोत्सव मिरवणुकीस प्रारंभ झाला. गुजरी चौक ते श्रीराम मंदिर आणि श्रींच्या निवासस्थानी अशी मिरवणूक जाऊन पुन्हा मंदिरात परतली. मार्गभर महिलांनी सडामार्जन करून आकर्षक रांगोळ्यांच्या पायघड्या घातल्या होत्या. “श्रीराम” च्या जयघोषात आणि पावली खेळत महिलांनी मिरवणुकीत विशेष रंगत आणली.
शेकडो भजनी दिंड्या मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या. ग्रामसेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष ललित अग्रवाल यांनी चहा-पाण्याची व्यवस्था केली होती. पालखी सोहळ्यात संस्थानचे उपाध्यक्ष उल्हास देशपांडे यांनी खांदेकरी म्हणून सहभाग नोंदवला.
प्रवचन, कीर्तन व गायन सेवा
१७ तारखेला सकाळी रामदास पंत आचार्य यांनी श्रींच्या जीवनचरित्रावर प्रवचन सेवा अर्पण केली. त्यानंतर गुलाल उधळून जन्मोत्सव साजरा करण्यात आला.
आठ दिवसांच्या कार्यक्रमात प्रवचनकार पंकज किंबहुने, वसू भारद्वाज, रामदासपंत आचार्य, मुकुंदराव मुळे यांनी प्रवचन सेवा दिली. कीर्तनकार संदीप बुवा मांडके, स. भ. व्यास अंबिकाताई लिंबेकर, प्रणव बुवा जोशी यांनी कीर्तनाद्वारे उपस्थितांना भक्तिरसात न्हाऊ घातले. तसेच गायन सेवा भुषण महाजन, घननिळ पाटील, आत्माराम दुतोंडे, श्रीपाद निंबेकर, कृष्णेंद्र वाडीकर, नागेश अडगावकर यांनी सादर केली.
महाप्रसादाने समारोप
रथोत्सव मिरवणुकीनंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. दासनवमी महोत्सवानिमित्त आठ दिवस विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भक्तिमय वातावरणात जन्मोत्सव सोहळ्याची सांगता करण्यात आली.

0 9 4 8 3 8
Users Today : 10
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *