बुलढाणा प्रतिनिधी :
स्वर सुरभी कराओके फॅन्स क्लब तर्फे व्हॅलेंटाईन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेली ‘म्युझिकल नाईट’ गोवर्धन सभागृह येथे उत्साहात पार पडली. प्रेम, देशभक्ती आणि सांस्कृतिक परंपरेचा संगम असलेल्या या कार्यक्रमाला संगीतप्रेमींची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.
शहीदांना श्रद्धांजली
कार्यक्रमाच्या प्रारंभी Pulwama attack मध्ये शहीद झालेल्या भारतीय जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर कलाकारांनी देशभक्तीपर गीते, प्रेमगीते तसेच युगल गीतांचे सादरीकरण करून वातावरण भारावून टाकले.
पोवाड्याने रंगली मैफल
येऊ घातलेल्या छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सुनील निकाळे व प्रिया गोरे यांनी सादर केलेल्या जोशपूर्ण पोवाड्याने उपस्थितांची मने जिंकली.
या कार्यक्रमाला बुलढाणा अर्बनचे अध्यक्ष डॉ. सुकेश झवर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांचे स्वागत ग्रुपचे अध्यक्ष डॉ. गजानन जयस्वाल यांनी केले. तसेच बुलढाण्यातील सुप्रसिद्ध संगीत शिक्षक अरविंद टाकळकर यांची विशेष उपस्थिती होती.
संगीत म्हणजे उपासना
अरविंद टाकळकर यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात संगीत ही एक उपासना असून जीवनातील ताणतणाव दूर करण्यासाठी ते प्रभावी माध्यम असल्याचे सांगितले. योग्य अभ्यास व तयारीनंतरच सादरीकरण करावे, असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला. त्यांचे स्वागत ग्रुपचे सचिव प्रा. रवींद्र पडघान यांनी केले.
कार्यक्रमात सुमारे ४० सभासदांनी गायन सादर केले. मोहन दलाल, संजय कुळकर्णी, संजय कस्तुरे तसेच साऊंड सिस्टीमसाठी सुधीर जोशी यांचे सहकार्य लाभले. कोअर कमिटीने विशेष परिश्रम घेत कार्यक्रम यशस्वी केला. आभार प्रदर्शन प्रशांत जैस्वाल यांनी केले.
Users Today : 7