एसबीसी (अ) प्रमाणपत्र रद्द निर्णयाविरोधात सामाजिक कार्यकर्ते अजहर शेख यांचा आक्रमक पवित्रा मुख्यमंत्री यांना निवेदन सादर; शासन निर्णय तात्काळ स्थगित करण्याची ठाम मागणी

KHOZ MASTER
2 Min Read

सोयगाव/ प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत

सोयगाव, फर्दापूर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन यांनी दिनांक १७ फेब्रुवारी २०२६ रोजी काढलेल्या शासन निर्णयान्वये विशेष मागास प्रवर्ग (अ) अंतर्गत मुस्लिम समाजास जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र देण्यासंदर्भातील पूर्वीचे शासन निर्णय रद्द करण्यात आले आहेत. या निर्णयाच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते अजहर शेख यांनी मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र शासन यांना निवेदन सादर करून तीव्र विरोध नोंदविला आहे.

सामाजिक कार्यकर्ते अजहर शेख यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे की, सदर निर्णयामुळे सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या मुस्लिम समाजातील विद्यार्थी, बेरोजगार युवक-युवती तसेच शासकीय सेवेत संधी मिळवू इच्छिणाऱ्या उमेदवारांवर अन्याय होत आहे. शिक्षण, नोकरी व विविध शासकीय योजनांमधील प्रतिनिधित्वावर याचा गंभीर परिणाम होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अजहर शेख यांनी पुढे म्हटले आहे की, विशेष मागास प्रवर्ग (अ) अंतर्गत दिल्या जाणाऱ्या सुविधा सामाजिक न्यायाच्या तत्त्वावर आधारित होत्या. त्या अचानक रद्द केल्याने हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य धोक्यात येण्याची शक्यता आहे तसेच स्पर्धा परीक्षांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांचे मोठे नुकसान होऊ शकते.

या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते अजहर शेख यांनी शासन निर्णय तात्काळ स्थगित करावा, सर्व संबंधित घटकांशी चर्चा करून विषयाचा पुनर्विचार करावा तसेच न्यायालयीन प्रक्रियेचा अंतिम निकाल लागेपर्यंत पूर्वस्थिती कायम ठेवावी, अशी ठाम मागणी केली आहे.

यावेळी त्यांनी “सबका साथ, सबका विकास” ही केवळ घोषणा न राहता ती प्रत्यक्षात उतरविण्यासाठी सरकारने सामाजिक न्यायाच्या दृष्टीने सकारात्मक आणि सर्वसमावेशक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे

0 9 4 8 1 9
Users Today : 59
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *