शिवजयंती मिरवणुकीतील किरकोळ वादाचा रस्त्यावर हिंसक शेवट; ११ जणांकडून चौघांवर रॉड-लाठ्यांनी हल्ला, एकाची प्रकृती चिंताजनक

KHOZ MASTER
2 Min Read

सोयगाव प्रतिनिधी – गोकुळसिंग राजपूत
सोयगाव येथे शिवजयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर दुसऱ्याच दिवशी गंभीर मारहाणीच्या घटनेत झाले. बुधवारी मिरवणुकीत झालेल्या वादाचा वचपा काढण्यासाठी गुरुवारी (दि. १९) दुपारी सोयगाव-शेंदुर्णी रस्त्यावर ११ जणांच्या टोळीने चौघांना अडवून लोखंडी रॉड, लाठ्या-काठ्या व धारदार शस्त्राने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात एकाची प्रकृती चिंताजनक असून तिघे जखमी झाले आहेत.
गंभीर जखमी शैलेश शंकर जोहरे (२५, रा. काळेनगर, सोयगाव) यांना प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी जळगाव जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, शैलेश जोहरे हे सागर इंगळे, परमेश्वर राऊत व गणेश कोळी (सर्व रा. काळेनगर, सोयगाव) यांच्यासोबत शिवजयंतीसाठी डेकोरेशन साहित्य आणण्यासाठी सोयगावहून शेंदुर्णीकडे मोटारसायकलने जात होते. दरम्यान, भैरवबा मंदिरासमोर संशयित आरोपींनी त्यांची मोटारसायकल अडवली.
संशयित आरोपी रितेश दिनेश काळे, श्रीराम गणेश काळे, तेजस रवी काळे, आदित्य रवी काळे, शुभम संजय गाडेकर, जयेश संजय गाडेकर, पवन सुकलाल परदेशी, दीपक सुकलाल परदेशी, आदित्य समाधान काळे, हर्षल कैलास काळे व स्वप्निल चौधरी (सर्व रा. सोयगाव) यांनी “शिवजयंती मिरवणुकीत रात्री काय भांडण करत होते?” असा जाब विचारला. यावर शैलेश जोहरे यांनी आपण त्या भांडणात सहभागी नसल्याचे सांगितले. मात्र, यानंतर आरोपींनी चौघांवर अचानक हल्ला चढवून बेदम मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या हल्ल्यात शैलेश जोहरे यांच्या डोक्यास व शरीराच्या विविध भागांना गंभीर दुखापत झाली असून इतर तिघांनाही मारहाणीत जखमा झाल्या आहेत. घटनेची माहिती मिळताच सोयगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गुरुवारी रात्री उशिरा ११ जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक पंकज बारवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून संबंधित आरोपींचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. मिरवणुकीतील किरकोळ वादाचे रूपांतर हिंसक घटनेत झाल्याने नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. परिसरात कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिसांकडून बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

0 9 4 8 1 9
Users Today : 59
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *