छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अकोट येथे भव्य अनावरण

KHOZ MASTER
2 Min Read

अकोट, दि. २१ (प्रतिनिधी)
राष्ट्रीय स्मारक समितीच्या वतीने अकोट शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ब्रॉन्झ धातूपासून साकारलेल्या अश्वारूढ पुतळ्याचे दिमाखदार अनावरण राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अॅड. आकाश फुंडकर यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले. ढोल-ताशांच्या निनादात आणि शिवगर्जनेच्या जयघोषात झालेल्या या सोहळ्याने परिसर दुमदुमून गेला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खा. अनुप धोत्रे होते. यावेळी आमदार हरीश पिंपळे, नगराध्यक्ष मायाताई धुळे, न.प. उपाध्यक्ष प्रथमेश बोरोडे, माजी आमदार संजय गावंडे, उपविभागीय अधिकारी मनोज लोणारकर, उपविभागीय पोलीस अधिकारी निखिल पाटील, तहसीलदार सुनील चव्हाण, न.प. मुख्याधिकारी शशिकांत बाबर, शहर पोलीस निरीक्षक अमोल माळवे, रा.स्व. संघाचे जिल्हा संघचालक अॅड. मोहनराव आसरकर, माजी नगराध्यक्ष हरिणारायण माकोडे, सहकार नेते नानासाहेब हिंगणकर, उत्सव समितीचे राजेश नागमते, राष्ट्रीय स्मारक समितीचे अरुण जवंजाळ यांच्यासह नगरपरिषद सभापती, नगरसेवक व अनेक मान्यवर उपस्थित होते.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर अॅड. फुंडकर यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. महाआरती व आतिषबाजीने सोहळ्याला अधिकच रंगत आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रम, शौर्य व प्रेरणादायी विचारांना उजाळा देणारा हा क्षण अकोटकरांसाठी अभिमानाचा ठरला.

ब्रॉन्झ धातूपासून साकारलेल्या अश्वारूढ पुतळ्याची भव्यता, शिल्पातील बारकावे आणि महाराजांची तेजस्वी मुद्रा उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होती. या स्मारकासाठी आमदार प्रकाश भारसाकळे यांनी निधी उपलब्ध करून दिला होता. त्यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगराध्यक्ष पुरुषोत्तम चौखंडे व ज्येष्ठ नगरसेवक मंगेश लोणकर यांनी काम पूर्णत्वास नेण्यासाठी विशेष प्रयत्न केले.

स्मारकाचा उत्कृष्ट आराखडा तयार करणारे आर्किटेक्ट मनिष भुतडा, गुणवत्ता पूर्ण काम करणारे कंत्राटदार इरशाद तसेच रांगोळीमधून शिवाजी महाराजांची प्रतिमा साकारणाऱ्या चतुर्भुज आर्ट क्लासचे अनिल काळे व विद्यार्थ्यांचा शाल-श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय स्मारक समितीचे अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष अॅड. ब्रिजमोहन गांधी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नगरसेवक मंगेश लोणकर व उमेश पवार यांनी तर आभार प्रदर्शन समितीचे विश्वस्त कैलास गोंडचर यांनी केले. या ऐतिहासिक अनावरण सोहळ्यास मोठ्या संख्येने नागरिक व शिवप्रेमी उपस्थित होते

0 9 3 3 4 4
Users Today : 1
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *