धाडच्या शिवजयंती मिरवणुकीत इसमावर जीवघेणा हल्ला छत्रपती शिवाजी महाराज चौकातील घटना

KHOZ MASTER
1 Min Read

धाड, दि. २१ (प्रतिनिधी) :

शिवजयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर धाड येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात मिरवणुकीदरम्यान किरकोळ वादातून एका इसमावर स्टीलच्या कड्याने जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली. या प्रकरणी धाड पोलिसांनी आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
वॉर्ड क्रमांक ६, बोराडे नगर येथील रहिवासी राजू शामराव शिंदे (वय ४१) हे १९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी शिवजयंतीची मिरवणूक पाहण्यासाठी शिवाजी चौकातील हॉटेल संगम टी सेंटरसमोर उभे होते. सायंकाळी सुमारे ७.३० वाजता मिरवणूक संभाजी महाराज चौकाकडून छत्रपती शिवाजी महाराज चौकात येत असताना आरोपी शिव कृष्णा बोर्डे (वय १९, रा. धाड) तेथे आला.
आरोपीने शिंदे यांना ‘बाजूला हो’ असे सांगितले. यावर ‘येथे भरपूर जागा आहे, तू बाजूने निघून जा’ असे उत्तर दिल्याने आरोपीने रागाच्या भरात हातातील स्टीलच्या कड्याने शिंदे यांच्या डोक्यावर दोन वेळा वार केल्याचे सांगितले जाते. या हल्ल्यात शिंदे गंभीर जखमी झाले. घटनेनंतर मिरवणुकीत एकच गोंधळ उडाला.
घटनेचे गांभीर्य ओळखून ठाणेदार प्रताप भोस, गोपनीय पोलीस अंमलदार राजू माळी, पोलीस अंमलदार श्रीकृष्ण चव्हाण व इतर पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करून आरोपीला ताब्यात घेतले.
याप्रकरणी राजू शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी शिव कृष्णा बोर्डे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८ (१) अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस अंमलदार श्रीकृष्ण चव्हाण करीत आहेत.

0 9 3 3 4 4
Users Today : 1
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *