बुलढाणा प्रतिनिधी :
मातृतीर्थ सिंदखेडराजा मतदारसंघातील लोणार तालुक्यातील मौजे चिखला येथे अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत व हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या संदर्भातील वादातून काही समाजकंटकांनी महिलांवर केलेली मारहाण ही अत्यंत निषेधार्ह व संतापजनक घटना असल्याची तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली.
आज चिखला येथे भेट देत ग्रामस्थ व शिवप्रेमींशी संवाद साधण्यात आला. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, विविध महापुरुषांनी समाजाला समानतेचा संदेश दिला आहे. परंतु महापुरुषांच्या नावावर समाजात फूट पाडण्याचे प्रकार थांबले पाहिजेत. अशा कृतींमुळे हिंदू समाजाचे मोठे नुकसान होत आहे.
चिखला प्रकरणातील सर्व दोषींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी करण्यात आली. याबाबत पोलीस विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा झाल्याचेही सांगण्यात आले. मात्र आरोपींवर कारवाई करताना निर्दोष नागरिकांना वेठीस धरू नये, गावातील सामंजस्य अबाधित राहिले पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
गावातील सर्व समाजातील लोक पिढ्यानपिढ्या गुण्यागोविंदाने नांदत आहेत. काही मोजक्या वाईट प्रवृत्तीच्या लोकांच्या कृत्यामुळे संपूर्ण समाजाला दोष देणे योग्य नाही. बहुतांश लोक सुस्वभावी असतात, हे लक्षात ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
राजमाता जिजाऊ यांच्या संस्कारात वाढलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करताना सर्वांना ‘मावळे’ ही समान उपमा दिली होती. या शब्दामुळे सर्व जाती-धर्मातील लोक स्वराज्य उभारणीसाठी एकत्र आले. त्यांच्यात कुठलाही जातीभेद नव्हता, असे सांगत सामाजिक ऐक्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
संजीवनीताई वाघ या महिलेचे कपडे फाडण्यापर्यंत गेलेला प्रकार अत्यंत निंदनीय असल्याचे सांगण्यात आले. खरेतर गावातील सर्वांनी एकत्र येऊन समन्वयाने शिवरायांचा पुतळा उभारणे अपेक्षित होते; मात्र काही विघातक प्रवृत्तीमुळे संपूर्ण राज्यभर गावाची बदनामी झाली, ही दुर्दैवी बाब असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
पोलिस कारवाईच्या भीतीने काही कुटुंबांनी गाव सोडल्याची माहिती देत, पोलिसांनी सर्व आरोपींची नावे जाहीर करावीत, म्हणजे निरपराध कुटुंबे पुन्हा गावात परततील, अशी मागणीही करण्यात आली. कोणत्याही परिस्थितीत गावागावांतील सौहार्दाचे वातावरण बिघडता कामा नये, असे आवाहन करण्यात आले.
यावेळी माजी आमदार संजय रायमुलकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. बळीराम मापारी, उपजिल्हा संघटक दिलीपराव देशमुख, तालुकाप्रमुख भगवान सुलताने, योगेश जाधव यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
Users Today : 47