लोणार प्रतिनिधी :
तालुक्यातील चिखला काकड येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून निर्माण झालेल्या वादात महिलांना झालेल्या अमानुष मारहाणीमुळे वातावरण चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी २१ फेब्रुवारी रोजी गावाला भेट देत पीडित कुटुंबांची भेट घेतली व घटनेचा सविस्तर आढावा घेतला.
“ज्यांनी आमच्या आया-बहिणींवर हात टाकला, त्यांना सरकार पाठीशी घालत असेल तर गाठ माझ्याशी आहे,” अशा शब्दांत त्यांनी प्रशासनाला ठणकावून इशारा दिला.
वादाची पार्श्वभूमी
३ फेब्रुवारी रोजी गावात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची स्थापना करण्यात आली होती. एका गटाच्या विरोधामुळे २० फेब्रुवारी रोजी वाद विकोपाला गेला आणि दोन गट आमनेसामने आले. या हाणामारीत संजीवनी वाघ यांच्यासह इतर महिला व लहान मुलांना बेदम मारहाण झाल्याची घटना समोर आली. या घटनेचे पडसाद राज्यभर उमटले आहेत.
पीडित महिलांशी संवाद साधल्यानंतर जरांगे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना गुन्ह्यातील सर्व दोषींवर कडक कलमे लावून २४ फेब्रुवारीपर्यंत अटक करण्याची मागणी केली. अन्यथा २५ फेब्रुवारी रोजी चिखला काकड येथे मराठा समाजाच्या वतीने मोठे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
शिवरायांचा पुतळा ज्या ठिकाणी स्थापित करण्यात आला आहे, तो तिथेच राहिला पाहिजे, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली. “हा लढा केवळ पुतळ्याचा नाही, तर मराठ्यांच्या स्वाभिमानाचा आहे. दोषींना अटक होईपर्यंत आम्ही शांत बसणार नाही,” असेही ते म्हणाले.
पोलिस बंदोबस्त वाढवला
गावात सध्या पोलिसांचा मोठा ताफा तैनात असून आतापर्यंत २१ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. जरांगे पाटील यांच्या भेटीनंतर मराठा समाज मोठ्या संख्येने गावात जमा होत असल्याने प्रशासनावर दबाव वाढला आहे. पुढील ४८ तास गावातील शांततेसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार असल्याचे चित्र आहे.
Users Today : 47