बुलढाणा, दि. २२ (प्रतिनिधी):
नाशिक जिल्ह्यातील सारूळ शिवारात अर्धनग्न अवस्थेत आढळलेल्या बुलढाण्यातील १६ वर्षीय संस्कृती काळे हिच्या खुनाचा उलगडा करण्यात नाशिक पोलिसांना यश आले आहे. चारित्र्यावर संशय घेत प्रियकरानेच आपल्या साथीदारांच्या मदतीने तिची मानेत चाकू भोसकून हत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले. या प्रकरणी अथर्व गजानन देशमुख (वय १९, रा. दुसरबीड, ता. सिंदखेड राजा, जि. बुलढाणा; सध्या सातपूर कॉलनी, नाशिक) आणि सुमित देवानंद सानप यांना अटक करण्यात आली असून तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे.
ओळख पटविण्याचे मोठे आव्हान
दि. २० फेब्रुवारी रोजी सारूळ शिवारात एका अनोळखी युवतीचा मृतदेह आढळून आला होता. मानेत चाकू खुपसून हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवित पोलिसांनी गुन्हा दाखल केला. घटनास्थळी पिझ्झाचा तुकडा वगळता ठोस धागादोरा न मिळाल्याने मृत युवतीची ओळख पटविणे हे मोठे आव्हान होते.
पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर व उपविभागीय पोलीस अधिकारी हरीश खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला. राज्यभरातील बेपत्ता मुलींची माहिती तपासताना अकोला येथील सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात संस्कृती काळे बेपत्ता असल्याची नोंद आढळली. पालकांशी संपर्क साधून मृतदेहाची ओळख पटविण्यात आली.
संशयित प्रियकरावर लक्ष केंद्रीत
तपासादरम्यान कुटुंबीयांनी अथर्व देशमुख याच्यावर संशय व्यक्त केला. तो नाशिकमधील त्र्यंबकेश्वर रोड परिसरातील नामांकित शिक्षण संस्थेत शिक्षण घेत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांना तो सातपूर कॉलनीत असल्याचे कळताच पथकाने सापळा रचला.
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त किशोर काळे व सहायक आयुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली सातपूरचे वरिष्ठ निरीक्षक प्रकाश अहिरे आदींच्या पथकाने कारवाई करत द्वारका भागातून अथर्वला अटक केली. तर सहआरोपी सुमित सानप याला संदीप फाउंडेशन महाविद्यालय परिसरातून ताब्यात घेण्यात आले.
प्रेमसंबंधातून निर्माण झाला संशय
संस्कृती आणि अथर्व यांच्यात शालेय जीवनापासून प्रेमसंबंध होते. दोन्ही कुटुंबांमध्ये जुने संबंध असल्याने येणेजाणे होते. दहावीनंतर दोघांना वेगवेगळ्या शहरांत शिक्षणासाठी पाठविण्यात आले. अथर्व नाशिक येथे तर संस्कृती अकोला येथे शिक्षण घेत होती.
तपासात उघडकीस आले की, अथर्वने अकोला येथे जाऊन संस्कृतीवर पाळत ठेवली. कॉलेज परिसरात ती एका तरुणासोबत वारंवार दिसल्याने संशयातून त्याने तिला कारमध्ये बसवून नेले. मित्रांच्या मदतीने वाटेतच तिच्या मानेत चाकू भोसकून हत्या केली व मृतदेह वाडीव-हे पोलीस स्टेशन हद्दीत टाकून दिल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.
Users Today : 47